Tue, Mar 19, 2019 16:18होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : ५३ बंधारे धोकादायक

कोल्‍हापूर : ५३ बंधारे धोकादायक

Published On: Jun 24 2018 1:56AM | Last Updated: Jun 23 2018 11:54PMकोल्हापूर : अनिल देशमुख

शेती सिंचनासाठी कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशभर करून देणारे ‘कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍या’ची जिल्ह्यातच दयनीय अवस्था झाली आहे. जिल्ह्यातील 53 बंधारे तर धोकादायक बनले आहेत. धोकादायक बनलेल्या बंधार्‍यांच्या यादीतील घुणकी-तांदूळवाडी बंधारा गुरुवारी कोसळला. यामुळे या बंधार्‍यांसाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

सिंचनासाठी बारमाही पाणी मिळावे, यासाठी शेतकरी दरवर्षी नदीला बांध घालायचे; पण पावसाळ्यात हे बांध वाहून जायचे, यातून लोकराजा राजर्षी शाहूंच्या कल्पनेतून कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचा विचार पुढे आला. छत्रपती राजाराम महाराजांनी 1928 साली पंचगंगेवर पहिला बंधारा बांधला. हा बंधारा छोटे धरण म्हणूनच ओळखले जाऊ लागले. काही वर्षांतच कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याची (केटीवेअर) ओळख देशभर झाली.

जिल्ह्यात सुमारे 352 बंधारे आहेत. यापैकी काही बंधार्‍यांचे बांधकाम सुरू आहे. सुमारे 293 बंधार्‍यांद्वारे जिल्ह्यात पाणी अडवले जात आहे. या पाण्याच्या वापरापोटी आकारल्या जाणार्‍या पाणीपट्टीतून जो महसूल जमा होतो, त्या महसुलातून या बंधार्‍यांची देखभाल-दुरुस्ती केली जाते. मात्र, जमा होणार्‍या महसुलाच्या तुलनेत देखभाल- दुरुस्तीसाठी येणारा खर्च प्रचंड आहे. यामुळे देखभाल-दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाला कसरत करावी लागत आहे. वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने बंधार्‍यांची दुरुस्ती वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच बंधार्‍यांचे बांधकाम 50  वर्षांपूर्वीचे आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याने नद्यांच्या पाण्यालाही वेग असतो. पावसाळ्यात तर अनेक बंधारे पाण्याखाली असतात. पाण्यातून वाहून येणार्‍या झाडांमुळे तसेच पाण्याच्या प्रचंड दाबामुळे बंधारे दिवसेंदिवस कमकुवत होत चालले आहेत. यामुळे जिल्ह्यात अनेक बंधार्‍यांचे खांब ढासळत चालल्याचे चित्र आहे. 

मिळणार्‍या निधीतून दुरुस्त होणार्‍या बंधार्‍यांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. या बंधार्‍यांसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, तो होत नसल्याने राज्य शासनाकडे विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करावे लागतात. मात्र, प्रस्ताव सादर करून निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईपर्यंत बंधार्‍यांची अवस्था आणखी खराब झालेली असते. दुरुस्ती करूनही पुन्हा काही तरी काम शिल्लक राहते, असेच चित्र आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी बंधार्‍यांचे वयोमान झाले आहे. या बंधार्‍याचा मूळ उद्देश शेतीसाठी पाणी अडवणे असा आहे, त्यानुसारच बंधार्‍यांची रचना आहे. मात्र, बहुतांशी बंधार्‍यांवर वाहतूक होत असते. काही बंधार्‍यांवर तर जड वाहतूकही सुरू असते. पाण्याचा दाब, जुने बांधकाम आणि दरवर्षी वाहनांचा पडणारा भार यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच बंधारे कमकुवत झाले आहेत. त्यांच्या दुरुस्तीऐवजी नव्याने बांधकाम करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने या सर्वांचा आढावा घेऊन राज्य शासनाने निधीची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे.

धोका वाढला

जिल्ह्यातील शेकडो गावांना बंधारा हा वाहतूकीचा मोठा आधार आहे. जे बंधारे कमकुवत झाले आहेत, त्यावरूनही वाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी बंधार्‍यावरील वाहतूकीखेरीज अन्य पर्याय नाही. काही बंधारे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्यात त्यांचा धोका अधिक वाढला आहे. पाण्याचा दाब आणि कमकुवत झालेला बंधारा यामुळे कोणत्याही धोका निर्माण होऊ शकतो.