Mon, May 27, 2019 01:14होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : एचआयव्हीचे १८ संशयित रुग्ण

कोल्हापूर : एचआयव्हीचे १८ संशयित रुग्ण

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 12:38AMइचलकरंजी : आराधना श्रीवास्तव

एचआयव्हीबाबत सर्वच स्तरावर व्यापक प्रबोधन करण्यात येत असताना जिल्हा एड्स प्रबोधन आणि नियंत्रण कक्षातर्फे केलेल्या सर्वेक्षणात एचआयव्ही पॉझिटिव्हचे 18 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. या रुग्णांच्या रक्‍तनमुन्याच्या पुढील चाचण्या केल्यानंतर त्यांच्या रोगाबाबत निष्कर्ष काढून उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. 

जिल्हा एड्स प्रबोधन आणि नियंत्रण कक्षातर्फे 6 फेब्रुवारीपासून ग्राम संवेदना हा जनजागृती कार्यक्रम 65 गावांतून राबवण्यात येत आहे. विशेषत: जिल्ह्यातील दुर्गम भागात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 19 हजार नागरिकांच्या आरोग्याबाबत पाहणी करण्यात आली. त्यामध्ये एचआयव्ही पॉझिटिव्हचे 18 संशयित रुग्ण मिळून आले. त्यांच्या रक्‍ताच्या पुढील चाचण्या करण्यात येत असून त्यानंतरच   अंतिम निष्कर्ष काढता येणार आहे. सध्या या रुग्णांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यानंतरच त्यांच्यावर उपचार हाती घेण्यात येणार आहेत. 

कोल्हापूर जिल्हा हा औद्योगिकद‍ृष्ट्या पुढारलेला आहे. जिल्ह्यात तीन ते चार मोठी औद्योगिक केंद्रे आहेत. यामध्ये इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग केंद्राचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शंभर किलोमीटरच्या परिघातील लोक कामाच्या शोधात जिल्ह्यात मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यामध्येच एचआयव्ही पॉझिटिव्हचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.  याशिवाय ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कर्नाटकातून ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने कोल्हापुरात येतात. कामाचा ताण, कामाच्या गैरसोयीच्या वेळा आणि असुरक्षित लैंगिक संबंध यामुळे त्यांच्यात एचआयव्हीचे प्रमाण अधिक असल्याचा पूर्वानुभव आहे. ज्यांचे कामानिमित्त महानगरात जाणे-येणे होते त्यांना तेथे हा जंतुसंसर्ग झाल्याने ग्राम संवेदना या जनजागृती मोहिमेवेळी आढळून आले आहे. 

सर्व एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांनी एटीआर (अँटी रिट्रोव्हीएल थेरपी) उपचार घेण्याची गरज असते. जिल्ह्यात चार इस्पितळांमध्ये याची सोय आहे. रुग्णांचे समुपदेशन केल्यानंतरच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतात. अनेकविध चाचण्या केल्यानंतर ज्यांचा सीडी फोर काऊंट 500 पेक्षा कमी असल्याचे आढळून येते त्यांना आयुष्यभर उपचार  घ्यावा लागतो. सीडी फोर काऊंटमुळे रुग्णाची रोग प्रतिकारक शक्‍ती कितपत कार्यरत आहे याचा निष्कर्ष काढता येतो. एचआयव्हीबाबत सर्वच स्तरावर व्यापक जनजागृती सुरू आहे. असे असताना जिल्ह्यात एचआयव्हीचे 18 संशयित रुग्ण मिळून येणे ही बाब धक्‍कादायक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषत: वाड्या-वस्त्यावर एचआयव्ही विरोधी जनजागृती मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे. 

अंतिम आकडेवारीकडे लक्ष

जिल्हा एड्स प्रबोधन व नियंत्रण केंद्रामार्फत आतापर्यंत 12 हजार नागरिकांची एड्सबाबतची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 18 जणांना एड्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर एड्सची लागण झालेल्यांची अंतिम आकडेवारी काय असेल याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.