होमपेज › Kolhapur › वाडी-वस्त्यांवरील रस्त्यांसाठी ९० कोटी

वाडी-वस्त्यांवरील रस्त्यांसाठी ९० कोटी

Published On: Dec 19 2017 1:59AM | Last Updated: Dec 18 2017 11:34PM

बुकमार्क करा

कोल्हापूर ः विठ्ठल पाटील

वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील धनगरवाडे आणि वाडी-वस्त्यांना जोडण्याच्या महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तेवीस ठिकाणच्या 122 कि.मी. रस्त्यांची सुधारणा आणि मजबुतीकरणासाठी सुमारे  90 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्याला यंदा पहिल्या टप्प्यात हा निधी मिळाला असून, पुढील टप्प्यासाठी गावांचे सर्वेक्षण सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मार्ग आणि तालुकांतर्गत रस्त्यांच्या सुधारणेसाठी वारंवार निधी उपलब्ध होत असतो; पण डोंगर कपारीतील धनगरवाडे आणि वाडी-वस्ती यांना जोडण्यासाठी तेथील रस्त्यांच्या सुधारणेला प्राधान्य देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दुर्गम भागात राहणार्‍यांची संख्या मोठी आहे. अनेक ठिकाणी तर पावसाळ्यात रस्ताच उपलब्ध नसतो. अशावेळी उन्हाळ्यातच प्रापंचिक गरजेच्या वस्तू खरेदी कराव्या लागतात. आजारी माणसाला डोलीतून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते.

जिल्ह्यातील ही परिस्थिती कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्‍यांना सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे येथील कार्यकारी अभियंता शेळके यांनी खास मोहीम राबवून अत्यंत दुर्गम भागाला मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. डोंगराळ आणि मुख्य गाव अथवा जिल्हा व  ज्यमार्गापासून लांब असणार्‍या वाड्यांना हे रस्ते जोडणार आहेत. त्यामुळे भविष्यात दुर्गम भागातील रस्त्यांना चांगला दर्जा प्राप्त होणार आहे. साहजिकच, तेथील रहिवाशांना बारा महिने दळणवळणाची सुविधा मिळेल.

यापूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून अशा गावांचा विकास केला जात असे; पण त्यासाठी हजारहून अधिक लोकसंख्येची अट होती.  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी संबंधित गावांत 500 लोकसंख्येची अट आहे. पुढील लोकसंख्येची अट अजून कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश वाडी आणि वस्त्यांच्या रस्त्यांची सुधारणा होण्यास गती येईल. निधी उपलब्धतेत सातत्य राहिल्यास जिल्ह्यातील वाडी-वस्त्या मुख्य रस्त्यांना जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात होईल.