Sat, Apr 20, 2019 10:43होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील ३४ प्राथमिक शाळा होणार बंद!

जिल्ह्यातील ३४ प्राथमिक शाळा होणार बंद!

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 11:44PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत स्थलांतर करण्याच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाचा प्राथमिक शिक्षणावर मोठा परिणाम होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 34 शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागणार  आहे.

शिक्षण विभागाने नुकतेच राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे निर्देश दिले. यावर शिक्षण क्षेत्रातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घुमजाव करीत शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. 0 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्यामधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत स्थलांतर करण्यात येणार आहे. कमी पटसंख्येतील विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतर केल्यानंतर बंद झालेल्या शाळांतील शिक्षकांची पदस्थापना ही विद्यार्थी समायोजन झालेल्या शाळेत तात्पुरती करण्यात येणार आहे.

गरजेनुसार आवश्यक त्या ठिकाणी त्यांचे समायोजन होणार आहे. बंद होणार्‍या शाळांत गरिबांची मुले शिक्षण घेत असून, यातील बहुतांश शाळा दुर्गम भागात आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी पायपीट कशी करणार, हा प्रश्‍न आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे शिक्षक व उपशिक्षकही अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.