होमपेज › Kolhapur › १४ लाख नागरिक रेशनपासून वंचित

१४ लाख नागरिक रेशनपासून वंचित

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 11:36PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील तब्बल 14 लाखांहून अधिक नागरिक रेशनवरील धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. एपीएल कार्डधारक असूनही अद्याप त्यांना धान्याचा लाभ मिळत नसल्याने चित्र आहे. रेशनवरील सरसकट धान्य वितरण बंद करून केंद्र शासनाने अन्न सुरक्षा योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी निश्‍चित करून त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. दारिद्य्ररेषेखालील ‘बीपीएल’ कार्डधारक, अंत्योदय योजनेंतर्गत कार्डधारक आणि एपीएल कार्डधारक यांच्यातून अन्न सुरक्षा योजनेसाठी लाभार्थी घोषित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात एकूण 9 लाख 55 हजार 385 कार्डधारक आहेत. यापैकी बीपीएल आणि एपीएल प्राधान्य कार्डधारकांची संख्या 4 लाख 98 हजार 259 आहे. या कार्डवरील सुमारे 24 लाख लोकांनाच अन्न सुरक्षा योजनेंतर्गत रेशनवरून धान्य दिले जाते. जिल्ह्यात एपीएल कार्डधारकांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील कार्डावरील नागरिकांची संख्या 42 लाख 20 हजार 536 इतकी आहे. यापैकी 24 लाख लोकांनाच धान्य मिळते. उर्वरित 22 लाख लोकांपैकी सुमारे 14 लाख लोक रेशनवरील धान्य मिळण्यास पात्र आहेत. मात्र, ते अद्याप धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. एपीएल कार्डधारकांना  रेशनवरील धान्य देण्याचा शासनाचा विचार आहे. त्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे गरज असतानाही केवळ अन्न सुरक्षा यादीत समावेश न झाल्याने जिल्ह्यातील 14 लाख  लोक धान्याची प्रतीक्षा करत आहेत.