Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Kolhapur › ग्रामीण रस्ते दुरुस्तीसाठी १० कोटी

ग्रामीण रस्ते दुरुस्तीसाठी १० कोटी

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 12:55AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी  2018-19 च्या जिल्ह्याच्या 364 कोटी 83 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यावर्षी नोव्हेंबरअखेर केवळ 42 टक्केच निधी खर्च झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेकडील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. त्यावर अतिवृष्टीने बाधित झाल्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रमाणपत्र घेऊन ग्रामीण रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्यांवरील खड्डे भरणे आणि सिलीकोट करणे याकरिता 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. यावर्षी जिल्हा सर्वसाधारण योजनेंतर्गत 249.22 कोटींचा आराखडा होता. मात्र, त्यात 30 टक्के महसूल व 20 टक्के भांडवली कपात करण्यात आली. यामुळे हा आराखडा 190 कोटी रुपयांचा झाला आहे. यापैकी 80 कोटी 36 लाख म्हणजे 42 टक्के निधी खर्च झाला आहे.

विशेष घटक योजनेंतर्गत 110 कोटींमधील केवळ 20 कोटी निधी खर्च झाला आहे. ‘ओटीएसपी’अंतर्गत 1 कोटी 90 लाखांत कपात होऊन 1 कोटी 33 लाखांची सुधारित तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 43 लाख 30 हजार इतका निधी खर्च झाला आहे असे सांगत पाटील  म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी आलेला निधी संपूर्ण खर्च करण्याची यंत्रणांची जबाबदारी आहे.