होमपेज › Kolhapur › दात्यांकडून रक्ताचे उदंड दान

दात्यांकडून रक्ताचे उदंड दान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या (सीपीआर) रक्तपेढीला जिल्ह्यातील रक्तदात्यांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या या प्रमुख रुग्णालयातील रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने दैनिक ‘पुढारी’ने दि. 14 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील रक्तदात्यांना योगदान देण्याचे आवाहन केले होते. 

दै. ‘पुढारी’च्या या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देताना अवघ्या दहा दिवसांत सीपीआरच्या रक्तपेढीत एक हजारहून अधिक बाटल्या रक्त जमा झाले. शिवाय, शासनाने रक्तपेढीसाठी निर्धारित केलेले रक्त संकलनाचे वार्षिक 10 हजार बाटल्यांचे उद्दिष्टही आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी चार महिने अगोदरच पूर्ण झाले आहे.
सीपीआरच्या रक्तपेढीतील रक्तसाठ्यासाठी 

दै. ‘पुढारी’ने आवाहन करताक्षणी जिल्ह्यातील विविध सेवाभावी संघटनांनी व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून एक चळवळच उभी केली होती. यानंतर शहर उत्तरचे आ. राजेश क्षीरसागर, शहर दक्षिणचे आ. अमल महाडिक यांच्यासह सुमारे 15 स्वयंसेवी संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमधून एक हजारहून अधिक बाटल्या सीपीआरच्या रक्तपेढीला उपलब्ध झाल्या. या रक्तामधून आता रक्त घटकांचे विघटन करण्याची अत्याधुनिक यंत्रणा सीपीआरमध्ये उपलब्ध असल्याने रक्त घटक विघटनाचे हे काम सुरू झाले. यातील प्लेटलेटस् या डेंग्यूबाधित रुग्णांसाठी वरदान ठरल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, सीपीआरच्या रक्तपेढीने खासगी रुग्णालयांनाही मदतीचा हात दिल्याने सीपीआर रक्तपेढी विशेष कौतुकास पात्र ठरली आहे.

सीपीआर रुग्णालयात रक्तपेढीत प्रतिमहिना सरासरी 400 रक्त बाटल्यांची आवक होती आणि यातून सर्वसाधारणपणे तेवढ्याच रक्त बाटल्या गरजू रुग्णांसाठी पुरविल्या जात होत्या. या रक्त बाटल्यांमध्ये बहुतांशी सर्व बाटल्या संपूर्ण रक्त (होल ब्लड) स्वरूपाच्याच होत्या. तथापि, गेल्या दोन वर्षांमध्ये रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया, ट्रॉमाकेअर, डायलेसिस, थॅलेसेमिया आदी विविध आजारांवरील उपचाराच्या सुविधांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करून देण्यात आली. यामुळे रक्तपेढीतील रक्ताच्या मागणीने एक हजार बाटल्यांचा आकडा ओलांडला होता. शिवाय, जिल्ह्यातील डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या आणि अन्य रोगांमध्ये गमावणारी प्रतिकारशक्ती सुधारण्याकरिता रक्त घटकांची मागणीही 300 बाटल्यांवर गेली होती.

ही मागणी पूर्ण करण्यासाठी सीपीआरच्या रक्तपेढीला रक्तदात्यांचा मोठा आधार हवा असल्याने दै. ‘पुढारी’ने जिल्ह्यातील नागरिकांना सार्वजनिक उत्तरदायित्वासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले होते. त्याला प्राथमिक टप्प्यावर उदंड प्रतिसाद मिळाल्याने रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संदीप साळुंंखे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले असून, कोल्हापूरकरांनी हीच जागरूकता कायम ठेवल्यास सर्वसामान्य गोरगरिबांचे प्राण वाचविण्यास त्यांचे योगदान अमूल्य असेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.