Wed, Apr 24, 2019 11:48होमपेज › Kolhapur › वारणा उजव्या कालव्याने घेतले 6 बळी

वारणा उजव्या कालव्याने घेतले 6 बळी

Published On: Feb 20 2018 1:20AM | Last Updated: Feb 19 2018 9:50PMकोडोली : संजय भोसले

जनतेला नको असताना हजारो कोटी रुपये खर्चून अपूर्ण व अर्धवट स्थितीत राहिलेल्या कामामुळे वारणा उजव्या कालव्याने पाच वर्षांत कोडोली परिसरातील सहाजणांचे बळी घेतल्याने कोडोली परिसरातील लोकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. जवळपास चाळीस वर्षांपासून वारणा नदीच्या डाव्या व उजव्या बाजूने कालवे निर्माण करण्यासाठी वारणा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. कोडोली ते डोणोली या 44 किलोमीटरच्या उजव्या कालव्याकरिता राज्य सरकारने 1978 साली 100 हेक्टर जमिनी संपादित केल्या होत्या. डोणोली ते कोडोली या कालव्याचे 16 फूट रूंदी तर 15 फूट खोलीचे काम केले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात कालव्यात झाडे झुडपेे गवत उगवले आहे.

अनेक ठिकाणी कालव्यात दूषित पाणी देखील साठले आहे. त्यामुळे या कालव्याच्या कामाबाबत जनतेत असंतोष पसरला आहे. सध्या या कालव्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले असल्याने अमृतनगर येथे शाळकरी मुलगा, मोहरे येथे एक शाळकरी मुलगा, काळे खोरीत एक तरुण, बच्चे सावर्डे येथे एक तरुण व काखे चांदोली वसाहतीजवळ सुरज खोचरे अशा सहाजणांचा बळी वारणा उजव्या कालव्याने घेतला आहे. मोहरे, बच्चे सावर्डे, थेरगाव, काखे-कोडोली या रस्त्यावरील कालव्यावर असणार्‍या पर्यायी रस्त्यावर वारंवार होणार्‍या अपघातांची दखल घेऊन या गावांच्या  ग्रामसभेत पूल व संरक्षक कठडा बांधावा, असा ग्रामसभेचा एकमुखी ठराव संबंधित ग्रामपंचायतीच्या वतीने वारणा प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना तीन वर्षांपूर्वी दिला आहे. परंतु, अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. 

कालव्यासाठी ज्या ठिकाणी दोन्ही गावांचा रस्ता तोडला आहे त्या ठिकाणी प्राधान्य क्रमाने प्रवासी पूल व त्यास संरक्षक कठडा बांधणे अपेक्षित होते. परंतु, आजअखेर खुदाई केल्यापासून सावर्डे, थेरगाव, माहेरे-काखे, कोडोली, पोखले मार्गावर पर्यायी रस्ता कालव्यावर निर्माण केला आहे. परंतु, त्यास कोणताही संरक्षक कठडा नाही. त्यामुळे अनेक वाहन धारकांना व नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. काहीवेळा हाकनाक बळी जाऊ लागले आहेत. कालव्याच्या कामावरती हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु, आवश्यक ठिकाणी प्रवासी पूल बांधले नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. संबंधित अधिकारी व कामाचा ठेका घेतलेल्या मक्‍तेदारांवर सदोष मनुष्यवधाखाली गुन्हा नोंदवावा, अशी मागणी होत आहे. कालव्याच्या बाजूने ओल्या पार्ट्या, दारूचे अड्डे तसेच अनैतिक व्यवसायाला कालव्याच्या बाजू गुन्हेगारांना सुरक्षित वाटू लागल्या आहेत.