Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Kolhapur › चातुर्मासातील श्रेष्ठ मास श्रावणाचे महत्त्व

चातुर्मासातील श्रेष्ठ मास श्रावणाचे महत्त्व

Published On: Aug 12 2018 3:06PM | Last Updated: Aug 12 2018 3:06PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. आषाढी एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा चार महिन्यांचा हा काळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. फक्त धार्मिक सण, उत्सव परंपराच नव्हे तर आरोग्य, विज्ञान, संस्कृती यासह भौगोलिकदृष्ट्या हा काळ खूप महत्वाचा आहे. या चार महिन्यांमध्ये अनुक्रमे महादेव, गणपती, शाक्त(देवी), कार्तिक या देवतांची पूजा केली जाते.  तसेच या काळात ऋतूमानानुसार होणाऱ्या भौगोलिक बदलामुळे मानवाच्या जीवनातही स्थित्यंतर येते. 

श्रावणाची सुरुवात होताच बालकवींच्या श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे या ओळी ओठांवर आपसूक येतात. या कवितेत बालकवींनी श्रावण महिन्यातील निसर्गाचे मनमोहक, विलोभनीय रुपाचे वर्णन केले आहे.  अशा या श्रावण महिन्यात अनेक व्रते केली जातात. विशेषत: या महिन्यात महादेवाची पूजा सर्वत्र केली जाते. 

हिंदू पंचागांनुसार आणि सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना आहे. याचे नाव श्रावण पडण्याचे कारण या महिन्यातील पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो. यावरुनच या महिन्याला श्रावण महिना म्हणतात. श्रावणात प्रत्येक वाराला कोणत्यातरी देवाचे व्रत असतेच. ते व्रत करण्याची पद्धत आणि परंपरा अनेक ठिकाणी वेगवेगळी आढळते. पंचांगानुसार पाचवा असलेला हा महिना चातुर्मासातील श्रेष्ठ मास आहे. श्रावणाला हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे.

श्रावणात सोमवारी महादेवाची पूजा करताना प्रत्येक आठवड्यात एक मूठ धान्य वाहिले जाते. याला 'शिवामूठ' म्हणतात. यामध्ये तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू या धान्यांचा समावेश आहे. सोमवारशिवाय मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. बुधवारी बुध, गुरुवारी बृहस्पतीचे पूजन करतात. शुक्रवारी पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे, हळदी-कुंकू देण्याचीही प्रथा आहे. श्रावणात सत्यनारायणाची पूजाही केली जाते. 

श्रावणातील दर सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते. देशातील भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. या १२ पैकी ५ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. 

सोमनाथ (गुजरात), मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश), महांकालेश्वर (मध्यप्रदेश), ओंकारेश्वर (मध्यप्रदेश ), वैजनाथ (महाराष्ट्र), भीमाशंकर (महाराष्ट्र), रामेश्वर (तामिळनाडु), नागेश्वर (महाराष्ट्र), विश्वेश्वर (उत्तर प्रदेश), त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र), केदारनाथ (उत्तराखंड), घृष्णेश्वर (महाराष्ट्र)

श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्णजन्माष्टमी, दहीहंडी हे सण व उत्सव साजरे केले जातात. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. शंकराने गळ्यात धारण केलेल्या नागराजाची पूजा करण्याची प्रथा आहे. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यात हा सण  मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.