होमपेज › Kolhapur › दुप्पट कृषी उत्पन्नासाठी आता किसान संमेलन

दुप्पट कृषी उत्पन्नासाठी आता किसान संमेलन

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 17 2018 11:24PMकागल : बा. ल. वंदूरकर

शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणा, नापिकी, घटणारे उत्पादन, वर्षानुवर्षे कायम असलेली शेतकर्‍यांची दयनीय अवस्था यामुळे राज्यातील शेतकर्‍यांची प्रगती व्हावी, त्यांच्या सद्यस्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी  कृषी अधिकारी, कर्मचारी यांना आता उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट देण्यात येत आहे. येत्या पाच वर्षांत म्हणजे 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट वाढायलाच हवे, यासाठी तालुकास्तरावर किसान संमेलन आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांना आता सर्वसामान्य शेतकर्‍यापर्यंत जावे लागणार आहे. 

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत सध्या शासकीय पातळीवर शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करून मार्गदर्शन करणे हा उद्देश ठेवून त्यादृष्टीने राज्य शासनाने सूचना देण्यात येत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, दुग्ध विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय, जिल्हा पणन अधिकारी, रेशीम उद्योगाचे अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग व इतर संलग्न विभाग यांच्याशी विचारविनिमय करून मार्गदर्शक सूचनानुसार सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये खासदार, आमदार व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांचाही सहभाग घेतला जाणार आहे.

सर्वसामान्य शेतकरी शेतातील अडीअडचणीवेळी बी - बियाणे आणि औषधे विक्री करणार्‍या दुकानदारांकडे जातात आणि त्यांच्याकडूनच सल्ला घेतात. बियाणे, कीड, मशागतीबद्दलही सल्ला घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. कृषी अधिकार्‍यांची अनेक शेतकर्‍यांना ओळखही नाही. त्यामुळे कृषी विभाग लोकाभिमुख होण्यासाठी सध्या शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

कागलचे कृषी कार्यालय आडवळणी

कागल तालुक्याचे कृषी कार्यालय शहरातील जयसिंगराव पार्क येथे पालिकेच्या इमारतीमध्ये आहे. हे कार्यालय शेतकर्‍यांना फारसे माहिती नाही. आडवळणी असलेल्या कार्यालयाला शासकीय इमारत अद्याप मिळालेली नाही. शेतकर्‍यांच्या सोयीकरिता कृषी कार्यालय प्रशासकीय इमारतीमधील शिल्लक असलेल्या जागेमध्ये नेण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. त्यामुळे पुरेशी जागा नसल्याचे कारण पुढे करून शेतकर्‍यांची गैरसोय केली जात आहे.