चंदगड : नारायण गडकरी
नागणवाडी येथील किरण गंगाराम चव्हाण यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अतिशय खडतर परिस्थितीत यश संपादन केले आहे. अठरा विश्व दारिद्य्रात किरण यांनी मिळवलेल्या यशाला कष्टाची किनार मिळाली.
कर्नाटकातील देवहिप्परगी (ता. सिंदगी, जि. विजापूर) हे त्यांचे मूळ गाव आहे. 25 वर्षांपूर्वी चव्हाण कुटुंबीय करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे वास्तव्यासाठी होते. त्यानंतर आई, वडील विजापूर येथे शेती सांभाळण्यासाठी गेले. तिघे भाऊ बहीण यांच्यासह अडकूर नंतर नागणवाडी येथे स्थिरस्थावर झाले. पडेल ती कष्टाची कामे करत या कुटुंबाचा चरितार्थ सुरू होता. किरणचा मोठा भाऊ आणि वहिनी चर खुदाईची कामे करत होते. या व्यवसायावरच त्यांनी प्रगती साधली.
आपण शिक्षित झालो नसलो तरी पुढच्या पिढीने शिक्षण क्षेत्रात प्रगती करावी, या हेतूने त्यांनी आपल्या दोन मुलींसह बहिणीच्या दोन मुलींच्या तसेच नातेवाईकांच्याही मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते स्वतः पेलतात. या सर्वांना उच्चपदस्थ अधिकारी करण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्या कष्टाची शिकणार्या मुलांना कधीच जाणीव करून दिली नाही. लहानपणापासूनच किरण आणि अनिल हे शाळेत खूप हुशार होते. हे ओळखून शिवाजी यांनी या दोघांनाही उच्चपदस्थ अधिकारी करण्याचे स्वप्न बाळगले होते.
अनिल हा दिल्ली येथील नवोदय विद्यालयात शिक्षण घेत आहे. किरण याचे सर्व शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे. किरण याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे पूर्ण केल्यानंतर त्यांने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी 2015 झाली प्राप्त केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास सुरुवात केली. अपार जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गुणवत्ता यादीत स्थान पक्के केले.
तब्बल २५ वर्षानंतर चंदगडला यश
कालकुंद्री येथील सुबराव पाटील यांनी २५ वर्षांपूर्वी केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवले होते. त्यानंतर नाणगवाडी येथील किरण चव्हाण यांनी यश मिळवले आहे. अलिकडच्या दशकात अनेकांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून यश संपादन केले आहे. किरण यांनी यशाची पताका फडकावल्याने तालुक्यातील अनेक मंडळांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.