Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Kolhapur › ट्रकच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

ट्रकच्या धडकेत दोघे गंभीर जखमी

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:16PMकिणी : वार्ताहर

नादुरुस्त होऊन थांबलेल्या ट्रकला पाठीमागून येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावरील घुणकी फाट्यावर घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकच्या दिशेने जाणारा ट्रक नादुरुस्त झाल्याने घुणकी फाट्यावर थांबला होता. दरम्यान, कांदा घेऊन कर्नाटकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने थांबलेल्या ट्रकला पाठमागील बाजूला जोरदार धडक दिली.

यामध्ये अण्णा दादा वरखडे (वय 50), शंकर जयसिंग माने (30 दोघेही रा. पाळसी, ता. बारामती) हे दोघे गंभीर जखमी झाले. या जखमींना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर कोल्हापूरकडे जाणार्‍या लेनमधील वाहतूक ठप्प झाली होती. बर्‍याच वेळानंतर अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून हायवे हेल्पलाईनच्या कर्मचार्‍यांनी व वडगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.