होमपेज › Kolhapur › राधानगरी अभयारण्यावर रुसलाय ‘जंगलचा राजा’

अभयारण्यावर रुसलाय ‘जंगलचा राजा’

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 2:00AMकोल्हापूर : विजय पाटील

जैवविविधतेने संपन्न परिसर म्हणून राधानगरी जंगल ओळखले जाते. गव्यांसह वाघ, बिबटे आणि शेकडो दुर्मिळ वन्य प्रजातींचा अधिवास हे या अभयारण्याचे वैशिष्टे आहे. पण या जंगलावर आता खुद्द जंगलचा राजा वाघोबा मात्र रुसला आहे. नुकत्याच झालेल्या प्राणीगणनेत येथे वाघाचे अस्तित्व आढळून आलेले नाही.

राधानगरी अभयारण्यात अनेक वर्षांपासून  तीन ते चार वाघांचे अस्तित्व  आढळून येते. त्यामुळे प्राणीगणनेत वाघाच्या पायांचे ठसे, विष्ठा, केस हमखास आढळतात. कोकणातील वन्यक्षेत्रातून तसेच तिलारीतून राधागरीत वाघांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. राधानगरी जंगल हे गव्यांसाठी प्रसिध्द असले तरी वाघ व बिबट्यांचे अस्तित्व असल्याने जंगलाला समृध्द निसर्ग वारसा आहे.निसर्गाची मुक्त उधळण असतानाही वाघोबा का रुसलेत हे कोडेच आहे. 

वाघ का रुसलाय?
राधानगरीत रानकुत्र्यांचे कळप वाढले आहेत. रानकुत्र्यांचे कळप ज्या ठिकाणी असतात अशा ठिकाणी वाघ शक्यतो थांबत नसतात. याउलट वाघाचे खाद्य मानले जाणारे  तृणभक्ष्यक प्राण्यांची कमतरता असेल तर वाघ या परिसरात अधिवास तयार करत नाहीत. या दोन्ही गोष्टी या वाघांना जंगलापासून दूर 
लोटणार्‍या मानल्या जातात. जाणकारांच्या मते या दोन्ही गोष्टींमुळे वाघोबा जंगलपट्ट्यात यायला तयार नाहीत.