होमपेज › Kolhapur › खंडणीसाठी तरुणाचे अपहरण : 8 जणांवर गुन्हा

खंडणीसाठी तरुणाचे अपहरण : 8 जणांवर गुन्हा

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 05 2018 12:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी कळंब्यातून तरुणाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांकडून सुमारे 78 हजार उकळल्यानंतर मारहाण करून त्याला सोडून देण्यात आले. अपहृत तरुण विजय निवृत्ती कांबळे (वय 38, रा. निगवे खालसा) याने गुरुवारी रात्री राजवाडा पोलिस ठाण्यात येऊन ही माहिती दिली. मुख्य संशयित विशाल शिंदेसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले.

विजय कांबळे हा कर्ज मिळवून देण्याचे काम करतो. सोमवारी (दि. 30 एप्रिल) त्याला विशाल शिंदे याने कामाचा बहाणा करून कळंबा साई मंदिरजवळ बोलावले. तिथे थांबलेल्या मोटारीतून विजय कांबळे याला जबरदस्तीने पाचगाव रोड, आर. के. नगर, भारती विद्यापीठमार्गे कागल पंचतारांकित एमआयडीसीतील निर्जनस्थळी नेण्यात आले. ‘तू कर्ज प्रकरणात भरपूर पैसे मिळवले आहेस, आम्हाला 25 लाख रुपये दे. नाहीतर तुला ठार मारणार’, अशी धमकी विशाल शिंदे व त्याच्या साथीदारांनी दिली. त्याला लोखंडी पाईपने मारहाण केली. रोख रक्कम व एटीएम हिसकावून घेतले. एटीएमवरून पैसे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण केवळ चार हजार रुपयेच खात्यावर असल्याने अपहरणकर्त्यांनी विजय कांबळेला पुन्हा मारहाण केली.

अपहरणकर्त्यांना पैसे देण्यासाठी विजय कांबळेने मोबाईलवरून मित्र बाबासाहेब कांबळे याला फोन लावला. ‘मला पैशाची अत्यंत आवश्यकता आहे, माझ्या घरातील दागिने विकून मिळतील तेवढे पैसे घेऊन सायबर चौकात ये’, असे त्याला सांगितले. यामुळे बाबासाहेब कांबळे यांनी विजयच्या घरातून मिळालेले दागिने देऊन सुमारे 78 हजार जमवले.हे पैसे सायबर चौकात एका अनोळखी इसमाने स्वीकारले. पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतर अपहरणकर्त्यांनी विजय कांबळेला सोडून दिले.

दबावाखाली असलेल्या विजय कांबळे याने दोन दिवसांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. अपहरणकर्ते कांबळे, राजा, गणीभाई अशी नावे एकमेकांची घेत असल्याची माहिती दिली. अपहरण करणार्‍यांमध्ये एकूण आठ जणांचा समावेश होता, असेही त्याने पोलिसांना सांगितले आहे.