Mon, Aug 19, 2019 09:06होमपेज › Kolhapur › ‘खंडोबा’ची चिवट झुंज व्यर्थ ठरवत ‘पीटीएम’ उपांत्य फेरीत

‘खंडोबा’ची चिवट झुंज व्यर्थ ठरवत ‘पीटीएम’ उपांत्य फेरीत

Published On: Apr 25 2018 12:56AM | Last Updated: Apr 25 2018 12:38AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

चुरशीच्या सामन्यात चिवट झुंज देणार्‍या खंडोबाची खेळी व्यर्थ ठरवत त्यांचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव करून  बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळाने ‘महापौर चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिन्ही गोल नोंदविणार्‍या पीटीएमच्या ऋषीकेश मेथे-पाटील याने हॅट्ट्रिकसह  विजयात मोलाचा वाटा उचलला. कोल्हापूर महानगर पालिकेच्या वतीने ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. मंगळवारी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा सामना पाटाकडील तालीम ‘अ’ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात रंगला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळाचा अवलंब झाला. शॉर्ट पासिंगसह आघाडीसाठी चढाया करण्यात आल्या. पीटीएमने योजनाबद्ध चढायांसाठी आघाडीसाठी खोलवर चढाया सुरू केल्या. यात त्यांना 15 व्या मिनिटाला यश आले. ओंकार जाधवच्या उत्कृष्ट पासवर ऋषीकेश मेथे-पाटील याने हेडद्वारे उत्कृष्ट गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली.

पाठोपाठ 36 व्या मिनिटाला अकिम-ओमकार पाटील, ऋषीकेश मेथे पाटील यांच्या संयुक्‍त चढाईत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत ऋषीकेशने दुसरा गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धातही त्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. अकिमच्या पासवर ऋषीकेशचा फटका गोलपोस्टला लागला. अकिमच्या पासवर ऋषीकेशचा हेड अपयशी ठरला. अकिमने डाव्या पायाने मारलेला फटका खंडोबाचा गोलरक्षक रणवीर खालकर याने हवेत झेपावत रोखला. 68 व्या मिनिटाला अकिमच्याच पासवर ऋषीकेशने बचावफळी भेदत गोलीच्या डोक्यावरून गोल नोंदवत संघाला 3-0 अशी भक्‍कम आघाडी मिळवून दिली. खंडोबाकडून गोल फेडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरूच होते. सिद्धार्थ शिंदे, अजिज मोमीन, सुधीर कोटीकेला, साईराज दळवी, प्रभू पोवार, विकी शिंदे यांनी लागोपाठ चढाया करून गोल फेडण्यासाठी केलेले प्रयत्न पीटीएमच्या भक्‍कम बचावापुढे पूर्णपणे अपयशी ठरले. यामुळे त्यांच्याकडून एकाही गोलची परतफेड झाली नाही. 

आजचा सामना : दिलबहार तालीम मंडळ वि. शिवाजी तरुण मंडळ, सायंकाळी 4 वाजता. 

Tags : Kolhapur, Khandoba,  PTM A, football, match, PTM, win, match