Wed, May 22, 2019 21:15होमपेज › Kolhapur › खाकी वर्दीतील जिगरी दोस्ती!

खाकी वर्दीतील जिगरी दोस्ती!

Published On: Aug 05 2018 1:29AM | Last Updated: Aug 05 2018 12:34AMकोल्हापूर : विजय पाटील

स्पर्धा आणि आक्रमक स्वभावामुळे पोलिस अधिकार्‍यांची पोलिस दलातील समवयस्कांशी दोस्ती होणं दुर्मीळ प्रकार असतो; पण जिल्ह्यातील तीन डीवायएसपी याला अपवाद आहेत. तिघेही तरुण पोलिस अधिकारी. एकाच बॅचचे. तिघांचे जिल्हे वेगवेगळे; पण ट्रेनिंगमध्ये स्वभाव पटला आणि मैत्र जमलं ते जीवाभावाचं. आता तिघेही एकाच जिल्ह्यात कार्यरत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही त्यांच्यातील समन्वय चांगला आहे. हे तिघे पोलिस अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात सोशल पोलिसिंगचा वापर करून काम करत असल्याने त्यांच्या मैत्रीची चर्चाही जोरदार सुरू असते.  

जयसिंगपूरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे. तर करवीर आणि शहराचे  डीवायएसपी म्हणून सूरज गुरव आणि प्रशांत अमृतकर काम करतात. या तिघांची मैत्री ‘थ्री इडियटस्’ या प्रचंड लोकप्रिय चित्रपटातील रँचो, राजू आणि फरहान या नायकांची आठवण करून देणारी आहे. कारण, तिघेही समवयस्क असल्याने आवडी-निवडींचं गणित बर्‍यापैकी जमतं. फिटनेस हा तिघांच्याही मैत्रीचा धागा आहे. त्यामुळेच सकाळी सहा वाजता शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सायकलिंग आणि जॉगिंगसाठी जसा जमेल तसा वेळ त्यांच्याकडून काढला जातो. डीवायएसपी पिंगळे हे कसबा बावड्याचे, गुरव हे इस्लामपूरचे आणि अमृतकर हे नाशिकचे; पण तिघांनाही ट्रेकिंग जाम आवडतं. गड-किल्ले पाहून इतिहास समजून घेणे हा त्यांच्या वर्षातील ठरलेला कार्यक्रम आहे. गुंडापुंडांवर कोण जास्त कारवाई करतो, याबद्दलची त्यांची स्पर्धाही पोलिस दलात चर्चेची आहे. 

मॅरेथॉन, पन्हाळा-पावनखिंड मोहीम, एव्हरेस्ट बेस कॅम्पसारख्या मोहिमा आखून सतत फिट आणि फ्रेश राहणारे हे तिघे जीवलग जिथे पोस्टिंग असेल तिथे स्वत:च्या कामाचा ठसा उमटवून येतात. लोकांशी थेट संवाद साधून यंत्रणा राबवणे हे त्यांच्या कामाचे समान सूत्र असल्याने निर्भीड काम करण्याचा त्यांचा हातखंडाही ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने चर्चेचा ठरत आहे.