होमपेज › Kolhapur › स्टुडिओच्या जागेचा तुकडा तरी ठेवा

स्टुडिओच्या जागेचा तुकडा तरी ठेवा

Published On: Dec 17 2017 12:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:21AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शालिनी स्टुडिओच्या जागेची विक्री झाली; पण कलाप्रेमींच्या आंदोलनामुळे दोन भूखंड स्टुडिओ  जागेसाठी आरक्षित ठेवले, त्या जागेची किंमत किती? यापेक्षा त्या जागेचा इतिहास व त्यामध्ये गुंतलेल्या भावनांची किंमत होऊ शकत नाही, किमान आहे तो जागेचा तुकडा तरी ठेवा, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

शिवाजी पुतळा येथून कलाकार व तंत्रज्ञांनी मोर्चा काढला. शालिनी स्टुडिओचे आरक्षण कायम राहिले पाहिजे, आरक्षणाचा ऑफिस प्रस्ताव फेटाळणार्‍या नतद्रष्ट नगरसेवकांचा धिक्कार असो, अशा घोषणा देत मोर्चा महापालिकेवर नेण्यात आला. यावेळी यशवंत भालकर, महामंडळाचे कार्यवाह बाळा जाधव यांनी, शालिनी स्टुडिओची जागा ही कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे.  या जागेवर जे शिल्लक भूखंड आहेत, त्यावर स्टुडिओ जागेचा आरक्षणाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. मग ही जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे का? महापालिकेने येणार्‍या अधिसभेत याबाबतचा फेरप्रस्ताव सादर करावा; अन्यथा महामंडळाच्या वतीने चक्री उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. 

यावेळी छाया सांगावकर यांनी महापालिकेने ठोस उपाययोजना न केल्यास पालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. शिष्टमंडळाच्या वतीने सहायक आयुक्त मिलिंद शिंदे यांना निवेदन देण्यात आले. महापालिकेने पुन्हा ऑफिस प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी केली. यावेळी बाळा जाधव, सतीश रणदिवे, शरद चव्हाण, सतीश बीडकर, शोभा शिराळकर, अर्जुन नलवडे, मिलिंद अष्टेकर, आकाराम पाटील, विजय शिंदे, स्वप्निल राजशेखर, संजय मोहिते, कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.