Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरला ‘रक्षा सचिव प्रशंसापत्र’ पुरस्कार

कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरला ‘रक्षा सचिव प्रशंसापत्र’ पुरस्कार

Published On: Jan 17 2018 1:57AM | Last Updated: Jan 16 2018 11:42PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयातर्फे देण्यात येणारा ‘रक्षा सचिव प्रशंसापत्र’ पुरस्कार कोल्हापूरची सुकन्या कस्तुरी दीपक सावेकर हिला जाहीर झाला आहे.  सामाजिक, सांस्कृतिक आणि साहसी खेळ प्रकारांत केलेल्या विशेष कामगिरीबद्दल तिला हा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती एनसीसीच्या फर्स्ट ऑफिसर रूपाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच एका विद्यार्थिनीस हा पुरस्कार मिळाला आहे. 

पाटील म्हणाल्या, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये  दहावीत शिकणारी कस्तुरी वयाच्या तिसर्‍या वर्षापासूनच ट्रेकिंग करत आहे. महाराष्ट्रातील दुर्ग लिंगाणा, अलंग, मदन, कुंलग, हरिश्‍चंद्रगड, रतनगड, सांदन दरी, साल्हेर, सालोटा, हरगड, गोरखगड, सिंहगड, वासोटा अशा अवघड गड-किल्ल्यांबरोबरच महत्त्वाचे किल्ले तिने सर केले आहेत. तसेच सह्याद्रीतील घाटवाटा व जंगल भ्रमंतीबरोबरच सलग 13 वर्षे पन्हाळा ते पावनखिंड ही दिवस व रात्रीची मोहीम ती करत आहे.

रॉक क्लायंबिंग कॉम्पिटिशन, ऑब्स्ट्रॅकल रेस कॉम्पिटिशन व बेस्ट ऑल राऊंडर स्टुडंट हा किताब तिने मिळविला आहे. उत्कृष्ट स्विमिंग, हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग, ट्रेकिंग, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस्, लाठीकाठी, मर्दानी खेळ, शालेय वक्तृत्व स्पर्धेत तिने यश मिळविले आहे. या  कामगिरीबद्दल ती या पुरस्काराची मानकरी ठरली. 

तिला खा. संभाजीराजे यांचे सहकार्य आणि खा. धनंजय महाडिक, आ. राजेश क्षीरसागर, एनसीसीचे कर्नल जे. पी. सायकिया, 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे सुभेदार मेजर नंदकुमार जगताप, सोनिया यादव, स्कूलच्या मुख्याध्यापिका मनरुपकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

पत्रकार परिषदेला दीपक सावेकर, मनस्विनी सावेकर, विनोद कांबोज, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.