Fri, Jul 19, 2019 18:19होमपेज › Kolhapur › शिये टोल नाक्यावर क्वॉलिसची कठड्याला धडक : दहा जखमी

शिये टोल नाक्यावर क्वॉलिसची कठड्याला धडक : दहा जखमी

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 27 2017 1:00AM

बुकमार्क करा

कोल्हापूर/कसबा बावडा : प्रतिनिधी 

देवदर्शन आटोपून मुंबईकडे निघालेल्या पर्यटकांच्या क्वॉलिसची शिये टोलनाक्याच्या कठड्याला धडक बसून झालेल्या अपघातात दहाजण जखमी झाले. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. शोभा पिल्ले या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्पना गणेश पडवळ (वय 29), सपना सचिन पवार (30), सचिन दिलीप पवार (31), क्रिशिका सचिन पवार (1 वर्ष), गणेश शिवाजी पडवळ (28), जनाबाई मच्छींद्र कोकणे (50), साधना शिवाजी पडवळ (45), शिवाजी कोंडाजी पडवळ (55), संतोषी शिवाजी पडवळ (31), महेश शिवाजी पडवळ (25) अशी जखमींची नावे आहेत. 

कांदीवली (मुंबई) येथील पवार आणि पडवळ कुटुंबीय पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी कोल्हापुरातून मुंबईकडे निघाले होते. शिये टोल नाक्याच्या कठड्याचा अंदाज न आल्याने क्वॉलिसची कठड्याला जोरात धडकली. या धडकेत चिमुकल्यासह दहाजण जखमी झाले. शोभा पिल्ले यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच कसबा बावड्यातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेसह काही खासगी वाहनांतून जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

जखमींवर तातडीने उपचार अपघातातील चार जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉक्टरांच्या पथकाला याबाबत सूचना केल्या. शोभा पिल्ले यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर क्रिशीका या चिमुकलीच्या छातीला मार लागल्याने उपचार सुरू आहेत. धोकादायक कठडा शिये टोलनाका येथील केबिन काढले असले तरी कठडे तसेच आहेत. याठिकाणी रात्रीच्यावेळी लाईट नसल्याने कठडे दिसून येत नाहीत. वारंवार या ठिकाणी अपघात होत असल्याने वाहनधारकांतून कठडे हटविण्याची मागणी होत आहे.