Tue, Mar 26, 2019 21:59होमपेज › Kolhapur › धामणी प्रकल्प पूर्ण करणारच : ना. खोत

धामणी प्रकल्प पूर्ण करणारच : ना. खोत

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 15 2018 1:35AM

बुकमार्क करा
कसबा तारळे : वार्ताहर

धामणी प्रकल्पाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पंधरा दिवसांमध्ये घेण्याची ग्वाही देऊन, जोपर्यंत या प्रकल्पाचे काम मार्गी लागत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे  आश्‍वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी  दिले. राधानगरी तालुक्यातील चौके येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते. ना. खोत म्हणाले, आम्ही काम करतो ते शेतकर्‍याला केंद्रबिंदू मानून. उसाच्या एफ.आर.पी.त आणखीन दोनशे रुपयांनी शेतकर्‍यांना आंदोलन न करता वाढ करण्यात येणार आहे.

हवामान स्वयंचलित यंत्र प्रत्येक मंडळामध्ये बसवण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना पीक नियंत्रणास याचा उपयोग होईल. शेतकर्‍यांच्या मालास चांगला भाव येण्यासाठी आयात करण्यात येणार्‍या मालावर अधिक कर बसवून शेतकर्‍यांना अधिक नफा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. शेवटच्या पात्र शेतकर्‍यापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत कर्जमाफी योजना बंद होणार नाही. सरकारात बसल्यानंतर शेतकर्‍याला न्याय कसा मिळेल, याकडे माझे लक्ष असते. राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून मी स्वतः पर्यटनमंत्र्यांसमोर बैठक घेणार आहे.

ए. वाय. पाटील म्हणाले, या विभागाचा विकास व्हावा यासाठी 1996 साली या धरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली. चौदाशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार या आशेने येथील लोकांनी जमिनी दिल्या; पण सतरा वर्षे प्रकल्प रखडला आहे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन धामणी प्रकल्प मार्गी लावावा. या परिसरातील हत्तीकडा जलप्रपात धबधबा, माऊली कुंड यांना पर्यटनस्थळ म्हणून घोषित करून त्यादृष्टीने विकास केल्यास येथील बेरोजगारी संपेल.

जयसिंगराव नांगरे-पाटील व माजी सरपंच एम. जी. गुरव यांनी धामणी खोर्‍याच्या प्रश्‍नांचा आढावा घेतला. यावेळी राधानगरी सभापती दिलीप कांबळे, सदस्य मोहन पाटील,  तंटामुक्त अध्यक्ष एम. जी. गुरव, आप्पासाहेब पाटील, ग्रामसेवक व्ही. आर. गनबावले, शिवाजी गोरुले, विठ्ठल सुतार आदी उपस्थित होते.