Sat, Jun 06, 2020 19:17होमपेज › Kolhapur › पर्यटनवाढीसाठी कला महोत्सव, सहलींचे आयोजन

पर्यटनवाढीसाठी कला महोत्सव, सहलींचे आयोजन

Published On: Dec 25 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 1:19AM

बुकमार्क करा

कसबा बावडा ः प्रतिनिधी

जिल्ह्यामध्ये पर्यटनवाढीसाठी येणार्‍या फेब्रुवारी महिन्यात 3 दिवसांचा कला महोत्सव, त्याचबरोबर एप्रिल-मे या दोन महिन्यांत दोन दिवसांच्या चाळीस ते पन्नास विनाशुल्क सहली आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. पोलिस उद्यान परिसरात आयोजित महाराष्ट्रात प्रथमच होत असलेल्या कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. महोत्सवाचा प्रारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.  

कोल्हापूरमध्ये पर्यटनवाढीसाठी गेल्या तीन वर्षांत अनेक उपक्रम राबविण्यात आले. चौक सुशोभीकरण, रस्ते सुशोभीकरण याबरोबरच नवऊर्जा उत्सव आणि रविवारी भव्य फ्लॉवर फेस्टिव्हल आयोजित केला आहे. 11 फेब्रुवारीपर्यंत हा फ्लॉवर फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. यामध्ये जागतिक कीर्तीच्या कलावंतांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील पर्यटनाच्या प्रचारासाठी एप्रिल, मे महिन्यांत 2-2 दिवसांच्या 40 ते 50 विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्यात येणार आहेत.

पर्यटनवाढीसाठी त्या लाभदायी ठरतील. या सहलींमध्ये जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटनस्थळे दाखविण्यात येणार आहेत. या सहलींसाठी ऑनलाईन बुकिंग करण्यात येणार आहे. या फ्लॉवर फेस्टिव्हलला पाच दिवसांत किमान 10 लाख नागरिक भेट देतील, असा विश्‍वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. फुलशेतीसाठी आवश्यक सर्व काही या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. शेतकर्‍यांनी फेस्टिव्हलला भेट देऊन फुलशेतीच्या नव्या कल्पना, वाणांची माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

रॅलीला जोरदार प्रतिसाद दरम्यान, सकाळी 11 वाजता विविधरंगी पानाफुलांनी सजविलेल्या चित्ररथ आणि देखाव्यांची रॅली ताराराणी चौकातून काढण्यात आली. रॅलीचा प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वज दाखवून झाला. करवीर निवासिनी अंबाबाईचा दिमाखदार रथ, छत्रपती शाहू महाराजांवर आधारीत देखावा, ग्रामसंस्कृती व लोक संस्कृतीचे दर्शन रॅलीच्या माध्यमातून झाले. रॅलीमध्ये घोडे, उंट, बैलगाडी यांचे दर्शन घडविण्यात आले. धनगरी ढोल, महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे नृत्य, सहभाग लक्षवेधी ठरला.

स्वच्छ भारत अभियान, मेक इन हंडियाचे लोगोही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.  रॅली धैर्यप्रसाद चौक, पितळी गणपतीमार्गे पोलिस उद्यानाजवळ आली. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या पत्नी सौ. अंजली पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, सुजय  पित्रे, राहुल कुलकर्णी, तेजस्विनी सावंत, सुभाष चौगले, अनंत खासबागदार, गिरीश खांडेकर, महेश जाधव, संदीप देसाई, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

पोलिस उद्यान परिसरात फुलांच्या आकर्षक कलात्मक रचना पाहायला मिळत आहेत. देशी-विदेशी फुलांच्या आधारे बनविलेली धरण प्रतिकृती, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज   यांचा फुलांनी सजलेला पुतळा, तसेच त्यांच्या जीवनातील आधारीत फुलांनी सजविलेली रचना पाहण्यासाठी खुली झाली आहे.