Sat, Aug 24, 2019 19:22होमपेज › Kolhapur › बालआरोग्य शिक्षणावर लक्ष देण्याची गरज

बालआरोग्य, शिक्षणावर लक्ष देण्याची गरज

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 2:08AMकसबा बावडा : प्रतिनिधी

आपल्या देशाचे भविष्य असणार्‍या बालकांचे आरोग्य हा चिंतेचा विषय आहे. अर्भक मृत्यू दराचे प्रमाण कमी करणे हा लांबचा पल्ला आहे. 2015-16 नुसार फक्त 62 टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण झाले होते. पाच वर्षे वयोगटाखालील दोन मुलांमागे एक मूल अशक्त, तीन मुलांमागे एक वजनाने कमी, तर पाच मुलांमागे एक कुपोषित अशी स्थिती आहे. अपुरं अन्न, निकृष्ट आहार आणि अशुद्ध पाणी अशी याची कारणे आहेत. बालकांचे आरोग्य आणि शिक्षणाबाबत आपण विशेष लक्ष दिल्यास भारत बलशाली आणि समृद्ध होईल, असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी शनिवारी व्यक्त केले.
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. विजय भटकर होते.  यावेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, कुलगुरू डॉ. प्रकाश बेहरे, विश्‍वस्त ऋतुराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाहू महाराज यांना डी.लिट. व डॉ. अरुणकुमार अगरवाल यांना डी.एस्सी. पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या पटांगणात झाला. चिदम्बरम म्हणाले, भारताने लोकसंख्या मर्यादित राहण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे जन्म दर 2.2 इतका खाली आला आहे. 2045 -50 मध्ये देशाची लोकसंख्या 160 कोटींपर्यंत होऊन स्थिर होईल, असा अंदाज आहे. स्त्री-पुरुष प्रमाणामध्ये सुधारणा होऊन हा दर 919 इतका झाला आहे. अधिक लोकसंख्या लाभदायक आणि अभिमानाची बाब असली, तरी या समुदायाला सुविधा देण्यास आपण कमी पडलो, तर गंभीर संकटांना तोंड द्यावे लागेल.

पदवी मिळवलेल्या डॉक्टरांचे अभिनंदन करताना ते म्हणाले, तुम्हा तरुण डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आहे. भारतात दरमाणशी डॉक्टरांचे प्रमाण हे असमतोल आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील डॉक्टरांवर कामाचा ताण आहे. सार्वजनिक आरोग्यसेवेकडे उपचार घेण्याचा धोका पत्करण्यास रुग्ण तयार होत नाहीत. यावेळी शाहू महाराज म्हणाले,  शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हेच सर्वोत्तम आहे. शिकणे आणि शिकवणे हे ध्येय प्रत्येकाने अंगीकारावे, असे आवाहन केले. डॉ. अरुणकुमार अगरवाल म्हणाले, सध्याच्या स्पर्धेच्या जगात शिक्षण, गती, कौशल्य असावेच; पण त्याच्यासोबत शहाणपण असणे गरजेचे आहे. त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दूरदृष्टीपणाचे कौतुक केले.

अध्यक्ष डॉ. भटकर म्हणाले, विद्यापीठाचे काम हे अत्यंत उत्कृष्टरीतीने सुरू आहे. दर्जेदार शिक्षणाने आम्ही तरुण पिढीला बलवान करत आहोत. यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश बेहरे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमास खासदार संभाजीराजे, महापौर स्वाती यवलुजे, माजी आमदार मालोजीराजे,  शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, महाराणी सौ. याज्ञसेनीराजे, सौ. संयोगीताराजे, सौ. मधुरिमाराजे, सौ. शांतादेवी डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. प्रतिमा सतेज पाटील, सौ. राजश्री काकडे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वित्त अधिकारी शाम कोले, परीक्षा नियंत्रक अरुण पोवार, बी. पी. साबळे, डॉ. शिवराम भोजे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. डी. आर. मोरे, संजय मंडलिक, व्ही. बी. पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त निवेदिता गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रांतील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.