Sat, Aug 17, 2019 16:12होमपेज › Kolhapur › मीच जिल्ह्याचा जादूगार : महाडिक

मीच जिल्ह्याचा जादूगार : महाडिक

Published On: Feb 13 2018 2:03AM | Last Updated: Feb 13 2018 1:33AMकसबा बावडा : प्रतिनिधी 

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत दोन्ही काँग्रेसला अनपेक्षित धक्‍का देत भाजपचे आशिष ढवळे सभापती झाले. यानंतर भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी  छत्रपती राजाराम कारखान्यावर  जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा जयघोष करत नगरसेवक व कार्यकर्त्यांनी  परिसर दणाणून  सोडला.  महापालिकेत दोन्ही काँग्रेसचे बहुमत असूनही स्थायी समिती सभापती निवडीत राष्ट्रवादीच्या सौ. मेघा पाटील पराभूत झाल्या.

या विजयानंतर ढवळे यांच्यासह विरोधी आघाडीचे सर्वच नगरसेवक व कार्यकर्ते राजाराम कारखान्यावर आले. सर्व नगरसेवकांनी महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. यामध्ये गटनेते सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, शेखर कुसाळे, किरण नकाते. सौ. सीमा कदम, रूपाराणी निकम आदींचा समावेश होता. यावेळी महाडिक म्हणाले, आघाडीच्या नगरसेवकांनी रचलेला इतिहास कौतुकास्पद आहे. मीच या जिल्ह्याचा जादूगार आहे.

यापुढेही महापालिकेच्या राजकारणात आम्ही गाफील नाही हे दाखवून देण्यासाठी सर्व नगरसेवकांनी सज्ज रहावे. स्थायी समितीनंतर आता महापौर निवड महत्त्वाची असून त्यातही भाजप-ताराराणीचाच झेंडा फडकावण्यासाठी आतापासून कामाला लागा. विरोधकांच्या कारभाराचा निकाल लागला आहे, महापालिकेतील आघाडीत असाच एकोपा ठेवत काम करा. रामराज्यात कधीही कोणावर अन्याय, अत्याचार झाला नव्हता. कोल्हापुरात  रामराज्याची ही सुरुवात असून आगामी महापौर आपलाच असेल, असेही ते म्हणाले..