होमपेज › Kolhapur › शिरोलीकरांच्या नादानं पालकमंत्र्यांना ‘जहागीरदार’ झाल्यासारखं वाटतंय !

शिरोलीकरांच्या नादानं पालकमंत्र्यांना ‘जहागीरदार’ झाल्यासारखं वाटतंय !

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 1:06AMकसबा बावडा  : प्रतिनिधी 

कसबा बावडा ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे. बावडा व लाईन बाजारवासीय हे प्रेम व आपुलकीच्या नात्याने एकत्र राहतात. आम्ही बावडेकर दहशतीच्या नव्हे तर प्रेमाच्या नात्याने प्रत्येक निवडणुकीत मतांचा कौल देत असतो. देशात लोकशाही येऊन 70 वर्षे होत आली तरी कोल्हापूरचे पालकमंत्री अजूनही ‘पेशवाई’ असल्याप्रमाणेच आजही ‘जहागिरी’ची भाषा बोलत आहेत, याचे आश्‍चर्य वाटते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले आणि पूर्वी सद्विचारी, सुसंस्कृत भाषा बोलणारे पालकमंत्री हे नाफ्ता व पेट्रोल भेसळ करणार्‍या शिरोलीकरांच्या नादाला लागल्यानेच अशी असंस्कृत भाषा बोलत आहेत, असे पत्रक कसबा बावड्यातील नगरसेवकांनी प्रसिद्धीस दिले आहे.

ज्या शाहू महाराजांनी संपूर्ण जगाला समतेचा संदेश दिला त्यांची जन्मभूमी असणार्‍या कसबा बावड्यात पालकमंत्र्यांनी अशा प्रकारची वक्‍तव्ये करणे ही अशोभनीय बाब आहे. त्यामुळे केवळ कोल्हापुरातच नव्हे तर अगदी विधान परिषदेतही दादांचा तोल सुटला आहे. त्यामुळेच ते दहशत, जहागिरी असे शब्द बोलत आहेत. त्यांनी कोल्हापुरात वाढलेल्या चोर्‍या, दरोडे, मारामार्‍या, अवैध धंदे याकडे त्यांनी लक्ष द्यावे. सत्तेच्या व वाईट प्रवृतींच्या संगतीमुळे दादांची अवस्था ‘ढवळ्याजवळ पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला’ अशी झाली आहे की काय? अशी शंका आमच्यासह सर्व कोल्हापूरच्या जनतेस येत आहे. रविवारी लाईनबाजार येथील कार्यक्रमात दादांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या तीन माजी नगरसेवकांची प्रवृत्ती म्हणजे ‘गरज सरो आणि...’ अशीच आहे. ‘जिकडं खोबरं तिकडं चांगभलं’ अशी वृत्ती असल्यानेच हे तिघेजण सत्तेच्या वळचणीला  गेले आहेत.  आ. सतेज पाटील  यांच्या धसक्यामुळेच दादांना इतर सर्व कार्यक्रम सोडून बावड्यातील कार्यक्रमाला यावेसे वाटले असेल,  असे पत्रकात शेवटी म्हटले आहे. 

पत्रकावर नगरसेवक श्रावण फडतारे, डॉ. संदीप नेजदार, माधुरी लाड, अशोक जाधव, मोहन सालपे, सुभाष बुचडे यांची नावे आहेत.