कोल्हापूर : प्रतिनिधी
वर्डिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून करवीर पोलिस ठाण्याच्या दारात जरगनगर येथील उच्चशिक्षित कुटुंबातील भावा-भावांत वरिष्ठ अधिकार्यासह पोलिसांसमोर‘सिनेमा स्टाईल’ हाणामारी झाली. समेटासाठी चर्चा चालू असतानाच अनपेक्षित घडलेल्या प्रकारामुळे पोलिस, उपस्थित नागरिकही अवाक् झाले. डोळ्यादेखत घडलेल्या प्रकारामुळे भलताच पारा चढलेल्या पोलिस अधिकार्याने दोन्ही कुटुंबांतील सदस्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांच्या हवाली केले.
मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला करवीर पोलिस ठाण्याच्या आवारात घडलेल्या मारहाणप्रकरणी मोठ्या भावाविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सायंकाळपर्यंत खुमासदार चर्चा रंगली होती.तपासाधिकार्यासमोरच झालेल्या मारहाणप्रकरणी दोन्ही गटातील जबाबदार मंडळीसह त्यांच्या मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नातेवाईकासह जरगनगर येथील नागरिकांनीही करवीर व लक्ष्मीपुरी पोलिसठाण्यात गर्दी केली होती. पण पोलिसांनी कुणालाही दाद लागू न देता अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
समाजकल्याण खात्यातील एका निवृत्त अधिकार्यांने आठवड्यापुर्वी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेवून थोरल्या मुलासह त्याच्या मुलाकडून मानसिक त्रास व वृध्दापकाळात त्याच्याकडून देखभाल होत नसल्याची तक्रार केली होती. पोलिस अधीक्षकांनी करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तिबिले, हवालदार संजय कोळी, बबलू शिंदे यांनी वृध्दासह त्यांची दोन मुले, सुना व नातवांना पोलिस ठाण्यात चर्चेसाठी बोलाविले. वडिलांनी जरगनगरात तीन मजली टोलेजंग बंगला बांधूनही ज्येष्ठ पुत्राकडून त्यांना तेथे राहण्यास मनाई केली जात आहे.शिवाय मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे,अशी तक्रार चंदगड येथील लहान मुलाने केली.त्यावर दोन्ही बाजूकडून चर्चा होत असतानाच थोरल्या भावाचा अचानक रागाचा पारा चढला. पोलिसांच्या समोरच त्याने धाकट्या भावाला ओढत पोलिस ठाण्याच्या दारात आणले आणि सिनेमा स्टॉईल हाणामारी सुरू केली.
मारामारी सोडविताना पोलिसांची दमछाक
फ्री स्टाईल हाणामारी सोडविताना अधिकारी, कर्मचार्यांची भंबेरी उडाली. काही काळ त्याचीच दमछाक झाली. पोलिस अधिकारी तिबिले यांचे चांगलेच पित्त खवळले. त्यांनी दोनही गटांचा खरपूस समाचार घेऊन सार्यांचीच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे रवानगी करून एकमेकांविरुद्ध कायदेशीर कारवाईस भाग पाडले. या घटनेमुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप जाधवही थक्क झाले. याची दिवसभर चर्चा रंगली होती.