Sun, Jul 21, 2019 02:20होमपेज › Kolhapur › कोल्हापुरी बाजारपेठेवर कर्नाटकी चिरमुर्‍यांचे वर्चस्व?

कोल्हापुरी बाजारपेठेवर कर्नाटकी चिरमुर्‍यांचे वर्चस्व?

Published On: Jan 17 2018 1:57AM | Last Updated: Jan 16 2018 11:26PM

बुकमार्क करा
राशिवडे : प्रवीण ढोणे

पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पद्धतीने सुरू असणारा चिरमुरे व्यवसाय केवळ कच्च्या मालामुळे व भात दरवाढीमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. 

प्रसिद्ध कोल्हापुरी चिरमुर्‍यांसाठी लागणारा हळवा भात मिळत नसल्याने जिल्ह्यातील चिरमुरे उत्पादनच थंडावले आहे. सध्या मात्र निपाणी, बेळगाव परिसरातूनच विक्रीसाठी चिरमुरे जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे चिरमुरे उत्पादित करून पोट भरणारा वैश्यवाणी समाज सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.

वैश्यवाणी, पानारी समाजाचा चिरमुरे उत्पादन करणे हा मुख्य व्यवसाय. यापूर्वी चिरमुर्‍यासाठी बेळगाव, निपाणी, संकेश्‍वर या भागातून हळव्या जातीचे भात पिकवले जात होते. या भातापासून तयार होणारे चिरमुरे अधिक चवदार असल्याने ते प्रसिद्ध होते. 

सध्या मात्र या जातीचे भातच पिकविले जात नाही, त्यामुळे अन्य जातीच्या भातापासून चिरमुरे तयार करावे लागत आहेत. जिल्ह्यामध्ये सुरू असणार्‍या चिरमुरे भट्ट्या सध्या बंदच आहेत. चिरमुरे तयार करण्यासाठी लागणारे भात, लाकडी भुस्सा, बगॅस याचे दरही गगणाला भिडले आहेत. 

निपाणी परिसरातून मिळणारे चिरमुरे व त्याचा दर पाहता जिल्ह्यात उत्पादित झालेले चिरमुरे महाग बनले आहे. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांनी कोल्हापुरी चिरमुर्‍यांकडे पाठच फिरविली आहे. 
पुर्वी 150 रुपये प्रतिपोते (10 किलो) असणारा दर सध्या 370 वर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यातील हजारो चिरमुरे भट्ट्या केवळ अपेक्षित व्यावसायिक नफा मिळत नसल्याने बंदच आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.