Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Kolhapur › कर्नाटकातील सराईत मोबाईल चोरटे जेरबंद

कर्नाटकातील सराईत मोबाईल चोरटे जेरबंद

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 24 2018 9:58PMकोल्हापूर : प्रतिनिधी

बाजारपेठ, मध्यवर्ती बसस्थानकासह मध्यवर्ती परिसरात भरदिवसा बंगल्यात घुसून महागडे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू हातोहात लंपास करणार्‍या कर्नाटकातील शिमोगा येथील सराईत माय-लेकांना विशेष पोलिस पथकाने बुधवारी जेरबंद केले. चोरट्यांकडून अडीच लाख रुपये किमतीचे 32 मोबाईल संच हस्तगत केले आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा व बेळगाव जिल्ह्यातही चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली संशयितानी दिली आहे. 

 रेखा दाण्णाप्पा वडर (वय 40), मणीकंड दाण्णाप्पा वडर (20, रा. रागेगुड्डा हॉस्टेल, शिमोगा, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत. या चोरट्यांनी विचारे माळ येथील निळा चौकात भाड्याची खोली घेऊन काही दिवसांपासून वास्तव्य केले होते. अशीही माहिती निष्पन्न झाली आहे, असे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.

संशयिताच्या झडतीत सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल व अन्य किमती वस्तू हस्तगत केल्या आहेत. धार्मिक स्थळासह बाजारपेठ, बसस्थानक या गर्दीच्या ठिकाणी हातोहात मोबाईल व अन्य वस्तू लंपास करण्यात चोरट्यांचा हातखंडा आहे. कोल्हापुरात गेल्या दोन-तीन महिन्यांत मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू असताना विशेष पथकातील उपनिरीक्षक किशोर डोंगरे, समीर मुल्ला व पथकाला कर्नाटकातील मायलेकांच्या हालचालीचा संशय आला. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. आज सकाळी रेखा, तिचा मुलगा मणीकंड येथील मध्यवर्ती बसस्थानकावर संशयास्पद स्थितीत आढळून आले. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील शॅकची झडती घेतली असता त्यामध्ये काही महागडे मोबाईल आढळून आले. पथकाने त्यांच्या खोलीचीही झडती घेतली. तेथूनही मोबाईल हस्तगत केल्याचे शहर पोलिस उपअधीक्षकांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत चोरट्यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा व बेळगाव जिल्ह्यांतील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात काही स्थानिक टोळ्यातील गुन्हेगारांचाही समावेश असावा. चौकशीअंती त्यांचीही नावे उघडकीस येतील, असेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले.