Thu, Jul 18, 2019 02:36होमपेज › Kolhapur › कानूर विद्यार्थिनी मारहाण प्रकरण

बालहक्क आयोगाकडे दाद मागणार : चौगुले

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:36AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील कानूर शाळेत मुख्याध्यापिकेने दिलेल्या अमानुष शिक्षेबाबत विजया निवृत्ती चौगुले या विद्यार्थिनीचे पालक आता बालहक्क आयोगाकडे न्याय मागणार आहेत. विजयाची आई सुनीता चौगुले आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोट्टी यांनी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनीच चार-पाच दिवस चालढकल केली, दाखल केल्यानंतरही अदखलपात्र अशी नोंद केली. मुख्याध्यापिका व शिक्षण संस्थेला वाचवण्यासाठीच पोलिसांनी जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोपही या दोघांनी केला. 

कानूर येथे श्री भावेश्‍वरी संदेश विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणार्‍या विजया चौगुले हिला वही आणली नसल्याच्या कारणास्तव 24 नोव्हेंबरला 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. या प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत विजयाच्या पालकांनी माध्यमांसमोर शनिवारी कथन केला. आई सुनीता, चुलते सुभाष चौगुले आणि डॉ. व्हसकोट्टी यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. या शिक्षेनंतर विजयाची प्रकृती बिघडली, पण याच शाळेत शिपाई म्हणून विजयाचे वडील निवृत्ती चौगुले हे काम पाहतात. संस्थेचे सचिव अशोक देवण यांच्याकडून दबाव आल्यानेच तक्रार दिली नसल्याचा आरोपही चौगुले यांनी केला. प्रकृती फारच बिघडल्याने गडहिंग्लजमधील रुग्णालयात उपचार घेत असताना 6 डिसेंबरला फिर्याद दाखल करण्यासाठी चंदगड पोलिस ठाण्यात गेलो, पण तिथे दखल घेतली गेली नाही. 5 दिवसांनी पोलिस निरीक्षक अशोक पोवार यांनी फिर्याद दाखल करून घेतली, पण ती करतानाही अदखलपात्र अशीच नोंद केली. 

दरम्यान, माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे 7 डिसेंबरला तक्रार देण्यात आली. त्यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत चौकशी सुरू केली. दरम्यानच्या काळात प्रकृती बिघडल्याने विजयाला सीपीआरला हलविले. तेथे माध्यमांनी दखल घेतल्याने पुढील उपचार सुरू झाले, पण या घटनेला 21 दिवस झाल्यानंतर उपचाराला सुरुवात झाली. यातून अपंगत्व आले तरी कोण जबाबदार असा सवाल करत डॉ. व्हसकोट्टी यांनी केला. याप्रकरणी जाणूनबुजून दिरंगाई करणार्‍या आणि मुख्याध्यापिकेला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस यंत्रणेसह भावेश्‍वरी शिक्षण संस्थेची चौकशी व्हावी, मुख्याध्यापिका अश्‍विनी देवण यांचे निलंबन व्हावे, अशी मागणी करून झालेल्या अन्यायाबद्दल बालहक्क आयोगाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.