Fri, May 24, 2019 20:30होमपेज › Kolhapur › नोव्हेंबरपासून अन्‍नपूर्णा शुगरतर्फे गाळपास प्रारंभ : घाटगे

नोव्हेंबरपासून अन्‍नपूर्णा शुगरतर्फे गाळपास प्रारंभ : घाटगे

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 02 2018 11:35PMकेंबळी  :वार्ताहर 

अन्‍नपूर्णा साखर कारखान्याचे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर्स घ्यावेत.  कारण स्वाभिमानी सभासद, कार्यकर्त्यांच्या पाठबळावर नोव्हेंबर 2018 च्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत कारखाना उसाचे गाळप करेल. असा ठाम विश्‍वास संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार संजय घाटगे यांनी व्यक्‍त केला. केनवडे (ता. कागल) येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजीत विशेष सभेत  ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आनंदा तळेकर  होते. यावेळी शिक्षण सभापती अंबरिश घाटगे प्रमुख उपस्थित होते. 

श्री घाटगे म्हणाले,  ‘कारखान्यासाठी सत्तर फूट उंचीचा डोंगर फोडून 35 फूटांची दहा एकरांत समांतर लेवल केली आहे. येत्या पाच महिन्यात कारखान्याला आवश्यक असणार्‍या सर्व इमारती पूर्ण होतील. आणि आठ महिन्यांत म्हणजेच 20 आक्टोबरपर्यंत पूर्ण मशनरी बसतील. त्या पुढील पंधरा दिवसांत वॉटर ट्रायल होऊन पाच ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत अन्‍नपूर्णा साखर कारखाना उसाचे गाळप करेल.  पूर्वीच्या नियोजीत ग्लुकोज प्रकल्पाच्या शेअर्स रकमेमुळे या अन्‍नपुर्णा साखर कारखान्याचा पाया घट्ट झाला आहे. असे स्पष्ट करून श्री घाटगे म्हणाले,’ कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन एक हजार पाचशे मे. टन असून ती दोन हजार मेट्रिक टन वाढवता येइल. यामधून केमिकल विरहित 1 लाख 20 हजार किलो गूळ पावडर तयार होईल. यापैकी एक लाख किलो गूळ पावडर विक्रीचे नियोजन झाले आहे.

माजी पंचायत समिती सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी धनराज घाटगे, मारुती गायकवाड यांनी मनोगत व्यक्‍त केले. स्वागत दिलीपसिंह पाटील यांनी  केले.  कार्यक्रमास विश्‍वास दिंडोर्ले, ए. वाय. पाटील, गुणाजीकाका निंबाळर, धनाजी गोधडे, तानाजी पाटील, सोनुसिंह घाटगे, संतोष ढवण, शिवसिंह घाटगे, रणजित मुडूकशिवाले उपस्थित होते. सुभाष करंजे यांनी आभार मानले. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे योगदान

कारखान्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा ठरणार्‍या रस्त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे योगदान झाल्याचे स्पष्ट करून संजय घाटगे म्हणाले, या कारखान्याला लागणारा मुख्य रस्ता अतिशिय अरुंद होता. तो रुंदीकरण करून चांगला दर्जाचा करून देण्याचे अभिवचन त्यांनी दिल्याचे सांगितले.