Thu, Apr 25, 2019 21:23होमपेज › Kolhapur › कळंबा तलावाचे सुशोभिकरण रखडले

कळंबा तलावाचे सुशोभिकरण रखडले

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 15 2017 11:40PM

बुकमार्क करा

कळंबा : वार्ताहर

कळंबा तलावाच्या सुशोभिकरणाचे पुन्हा भिजत घोंगडे पडले आहे. दरम्यान, तलावाच्या सुरक्षेचा बोजवारा उडाला असून ओल्या पार्ट्या करून मद्यपींनी तलावावरती धुडगूस घातला आहे. वृद्धांसाठी असणार्‍या विरंगुळा केंद्राची मोडतोड केली आहे.  नागरिकांनी मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलमी आहे. 

10 कोटींच्या निधीमधून गेली चार वर्षे कळंबा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे.  त्यामध्ये प्रवेशद्वार, पदपथ उद्यान, सायकल ट्रॅक, कॅटल वॉश, बंधारा दुरुस्ती, ऑक्सिजन पार्क अशी अनेक विकासकामे कासवगतीने सुरू आहेत. उद्घाटनापूर्वीच बंधार्‍यांची तटबंदी ढासळू लागली आहे. अनेक ठिकाणी त्याला तडे गेले असून नवीन केलेल्या दुरुस्तीचे काम पूर्ण खचले आहे. त्यामुळे बंधार्‍याच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कळंबा तलावाच्या पाणी साठवणुकीचा अविभाज्य घटक म्हणून बंधार्‍याकडे पाहिले जाते. 133 वर्षाच्या  बांधणी नंतर पहिल्यांदाच बंधार्‍याची डागडुजी केली जात आहे. त्यामुळे त्याचे उत्कृष्ठ पद्धतीने काम पूर्ण होणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर उर्वरित कुस्ती मैदान, अ‍ॅम्पी थिएटर्स, पक्षी टॉवर, सायकल ट्रॅक, मनोरा दुरुस्ती, पदपथ दिवे यासह असंख्य विकासकामे दर्जेदार होणे गरजेचे आहे. पुढील कामाची महापालिका प्रशासनाने पाहणी करून व माहिती घेऊन ठेकेदाराला निधी उपलब्ध करून कळंबा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ व पर्यटक प्रेमीमधून व्यक्त होत आहे.  तलाव परिसरामध्ये खरमाती, जीर्ण, कपडे, जैव, घनकचरा मोठ्या प्रमाणात आणून टाकला आहे. त्यामुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहोचली असून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. महापालिका प्रशासन व कळंबा ग्रामपंचायत यांनी तलाव परिसरामध्ये सीसीटीव्ही लावून कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणेची गरज निर्माण झाली आहे. तसेच प्रदूषण करणार्‍या घटकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.