Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Kolhapur › जयंती नाला पाईप बदलण्याचे काम बुधवारपर्यंत पूर्ण करा

जयंती नाला पाईप बदलण्याचे काम बुधवारपर्यंत पूर्ण करा

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 12:07AM

बुकमार्क करा
काेल्हापूर : प्रतिनिधी

जयंती नाल्यातील पाईप बदलण्याचे काम येत्या बुधवारपर्यंत (दि.10) पूर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना शुक्रवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांचा दळवी यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी पंचगंगा प्रदूषण प्रश्‍नी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली. दळवी यांना विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात 
आले. जयंती नाल्यातील पाईप बदलण्याचे काम वेगाने पूर्ण करा. ज्या कंत्राटदाराकडून हे काम सुरू आहे, त्याकडूनच ते पूर्ण करून घ्या. दि.10 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण झाले पाहिजे. याकरिता दररोज

त्या कामाच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. आयुक्त, मुख्याधिकार्‍यांवर  कठोर कारवाई करा पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी बेजबाबदारपणा दाखवणार्‍या महापालिका आयुक्त, इचलकरंजीचे मुख्याधिकारी यांच्यासह प्रदूषण मंडळांचे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, सतीश कुरणे आदींनी निवेदन दिले. पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी महापालिकेचा एक तास विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. या कारवाईची नोंद महापालिका अधिकार्‍यांच्या सी.आर. (गोपनीय अहवाल) मध्ये करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पंचगंगा प्रदूषण प्रश्‍नी केवळ बैठकाच घेतल्या जात आहेत. या बैठकात दिल्या जाणार्‍या आदेशांचे, सूचनांचे कोणीही अधिकारी पालन करत नसल्याचे दिसत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काहीच दिलासा मिळत नाही. यामुळे या बैठकांचा फार्स, शासकीय पैशांचा अपव्यय कशासाठी, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली. पर्यावरण संरक्षण कायदा कलम 15 तसेच सी. आर.पी. सी. कलम 133 नुसार कारवाईचे आदेश उपविभागीय अधिकारी करवीर आणि इचलकरंजी यांना देण्यात यावे, अन्यथा दि.26 जानेवारी रोजी आत्मक्लेष आंदोलन करण्याचा इशाराही संस्थेच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.

तातडीच्या उपाययोजना करा; अन्यथा आंदोलन

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यामुळे 28 डिसेंबर रोजी शिरोळ तहसीलदारांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना सहा तास घेराव घातला होता. यानंतर लेखी आश्‍वासन देऊन सुद्धा प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे नदीकाठावरील 50 गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. याबाबत तातडीने उपायोजना कराव्यात, अन्यता लोकांचा उद्रेक होईल, त्यातून उग्र आंदोलन होईल, असा इशारा स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला. या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सागर शंभुशेटे, शैलेश चौगुले, रावसाहेब भगारे, सागर मादनाईक आदी उपस्थित होते.