Tue, Nov 20, 2018 01:43होमपेज › Kolhapur › रेल्वे स्थानकावर साकारणार ‘कलापूर एक्स्प्रेस’

रेल्वे स्थानकावर साकारणार ‘कलापूर एक्स्प्रेस’

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 12:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, रंकाळा, पन्हाळा, जोतिबा, शाहू जन्मस्थळ, खासबाग आदी कोल्हापूरचे वैभव कॅनव्हासवर अवतरणार आहेत. त्यातील निवडक चित्रे कोल्हापूर रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी लावण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या वतीने ‘कलापूर एक्स्प्रेस’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.24) मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे प्रबंधक (वाणिज्य) कृष्णात पाटील व जिल्ह्यातील नामवंत चित्रकारांच्या उपस्थितीत रेल्वे स्थानकावर हा कार्यक्रम होणार आहे.

मध्य रेल्वेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. कोल्हापूर रेल्वेस्थानक इमारतीच्या काही भिंतींवर कोल्हापूरची परंपरा सांगणारी चित्रे रेखाटली आहेत. आता कोल्हापूरच्या वास्तववादी चित्रपरंपरेचा गौरव आणि स्थानकाचे सुशोभिकरण, या हेतूने मध्य रेल्वेच्या वतीने ‘कलापूर एक्स्प्रेस’ हा उपक्रम आयोजित केला आहे. कोल्हापूरचे रेल्वेस्थानक ऐतिहासिक आहे, तसाच कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आहे तो चित्रांच्या रूपाने सादर करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यटन, क्रीडा आदींची परंपरा, वारसा सांगणारी विविध स्थळे निवडक चित्रकारांकडून रेखाटली जाणार आहेत. याकरिता शुक्रवारी जिल्ह्यातील निवडक चित्रकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना चित्रकलेचे आवश्यक ते सर्व साहित्य वितरीत केले जाणार आहे. यानंतर संबंधितांकडून आलेल्या चित्रांतून निवडक चित्रे रेल्वे स्थानकावर लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, विलास बकरे, के. आर. कुंभार, डॉ. नलिनी भागवत हे प्रमुख उपस्थित राहणार असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.