Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Kolhapur › कर्नाटकातील काळम्मावाडी कालवे 22 वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत

कर्नाटकातील काळम्मावाडी कालवे 22 वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

म्हाकवे : वार्ताहर

काळम्मावाडी धरणातील कर्नाटकच्या वाटणीचे पाणी कालव्याद्वारे म्हाकवेतून कर्नाटक-सिदनाळपर्यंत सोडावे, अशी मागणी आप्पाचीवाडी-कुर्ली ग्रामस्थांनी केली आहे. काळम्मावाडी प्रकल्पाला मान्यता मिळाली त्यावेळी 4 टी. एम. सी. पाणी कर्नाटकाला देण्याचा करार महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात करण्यात आला होता. त्यामुळे वेदगंगा नदी व कालवा यामधून हे पाणी देण्याचे ठरले होते. त्यानुसार चिखली बंधार्‍यातून कर्नाटकात पाणी सोडले जाते. मात्र, कालव्यातून एक गाव वगळता एकाही कर्नाटकातील गावाला कालव्याचे पाणी मिळालेले नाही.  वारंवार मागणी करूनही महाराष्ट्रातून कर्नाटकात पाणी सोडले जात नाही. याबद्दल येथील शेतकर्‍यांतून नाराजी व्यक्‍त होत आहे. 

कर्नाटक शासनाने लाखो रुपये खर्च करून म्हाकवेपासून पुढे कालवा खुदाई केली आहे.  अगदी सिदनाळ गावापर्यंत हा कालवा खोदण्यात आला आहे. लाखो रुपये खर्च करून कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. दर पंधरा दिवसांतून निढोरी कालव्यातून म्हाकवे हद्दीपर्यंत पाणी सोडले जाते. मात्र, म्हाकवेत पाणी पोहोचले की पाणी बंद केले जाते. त्यामुळे कर्नाटकातील आप्पाचीवाडी, कुर्ली, आडी, बेनाडी, सौंदलगा, सिदनाळ या गावांना पाणीच मिळत नाही. 1996 पासून या कालव्यातून सातत्याने पाणी सोडले जात आहे. मात्र, गेल्या 22 वर्षांत एकदाही  कालव्यात काळम्मावाडीचे पाणी पाहण्याचे भाग्य ग्रामस्थांना मिळालेले नाही. पर्यायाने कालवे आहेत. मात्र, कालवे कोरडे अशी अवस्था या सीमाभागातील गावांची झाली आहे. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, Kalammawadi canals, Karnataka, waiting, water, 22 years


  •