Mon, Jul 22, 2019 00:37होमपेज › Kolhapur › दाजीपूर अभयारण्यात रंगणार काजव्यांचा प्रकाशोत्सव

दाजीपूर अभयारण्यात रंगणार काजव्यांचा प्रकाशोत्सव

Published On: Apr 23 2018 1:51AM | Last Updated: Apr 22 2018 11:14PMकौलव : प्रतिनिधी

आजच्या धावत्या झगमगाटी दुनियेत काजव्यांची मनमोहक दुनिया हरवली आहे. मात्र, राधानगरीतील बायसन नेचर क्लब व राधानगरी नेचर क्लबच्या वतीने मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात स्वतंत्रपणे काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.त्यामुळे पर्यटकांना काजव्यांची मनमोहक दुनिया अनुभवता येणार आहे.जैवविविधतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्यात गवारेड्यांसह विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सर्प, फुलपाखरे आढळतात. या अभयारण्यात उन्हाळ्याच्या अखेरीस शेकडो प्रकारचे काजव्यांचे थवे रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण करतात. गेल्यावर्षी बायसन नेचर क्लबने काजवा महोत्सव आयोजित करून काजव्यांचा मनमोहक जीवनपट उलगडला होता. बालपणी तिन्हीसांजेला हवेत उडणार्‍या काजव्यांमागे धावून पकडलेला काजवा खिशात चमकताना पाहण्याची मजा औरच होती. मात्र, सध्याच्या धावत्या युगातील झगमगाटात काजव्यांचा प्रकाश हरवला आहे. भावी पिढ्यांना काजवा म्हणजे काय, हे सांगावे लागणार आहे.

दाजीपूर अभयारण्यातील जैवविविधतेत काजवा हा महत्त्वाचा कीटक आहे. मे महिन्यात वळीव पाऊस लागला की, अभयारण्यातील वृक्षराजीवर काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरते. आंबा, जांभूळ,
हुंबर, अंजनी, हिरडा व बेहडा अशा निवडक वृक्षांवर काजव्यांची वस्ती असते. काळ्याकुट्ट रात्री हजारो काजवे पांढरा पिवळा, निळा, तांबडा, हिरवा, नारंगी अशा नाना रंगांची उधळण करतात. जगात काजव्यांच्या दोन हजारांवर प्रजाती आहेत. काजव्यांच्या शरीरात ल्युसीफेरीन नावाचे द्रव्य असते त्याची ऑक्सिजनशी विक्रिया झाली की, काजवे प्रकाशतात. अंडी, अळी,कोश असा जीवन प्रवास करणार्‍या काजव्यांच्या अळीचे दोन आठवड्यात प्रौढावस्थेत रूपांतर होते. बेडूक व कोळ्यांसह अनेक पक्ष्यांचे काजवा हे खाद्य असून, मे व जून हा काजव्यांचा प्रजनन काळ असतो.काजव्यांची वाढती संख्या पावसाच्या आगमनाची वर्दी देते. मोसमी पावसाचा जोर वाढला की, काजव्यांचे जीवनचक्र संपुष्टात येते. अवघ्या काही आठवड्यांचे आयुष्य लाभलेला काजवा रंगांची मुक्‍त उधळण करतो. त्याच्या प्रकाशाचा वेग 510ते 670 नॅनोमीटर असतो. 

राधानगरीतील बायसन नेचर क्लबने दिनांक 19 ते 31 मेअखेर पर्यटकांसाठी काळम्मावाडी रोडवर मोफत काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. आडवाटेवरचे कोल्हापूर यांतर्गत हा महोत्सव होणार असून, तज्ज्ञांची व्याख्याने, राममेवा प्रदर्शन, जंगली चित्रपट व पर्यटकांना विविध प्रकारची माहितीही दिली जाणार आहे, असे क्लबचे उपाध्यक्ष सम्राट केरकर यांनी सांगितले. तर राधनगरी नेचर क्लबतर्फे दिनांक 26 मे रोजी फराळे-राजापूरनजीक काजवा महोत्सव आयोजित केला आहे.

Tags : Kolhapur, Kajwa, Festival, Light,  Dajipur Wildlife Sanctuary