Mon, Mar 25, 2019 04:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कागलला पशुधन धोक्यात

कागलला पशुधन धोक्यात

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 1:53AM

बुकमार्क करा

बानगे : रमेश पाटील

कागल तालुक्यात वाड्या-वस्त्यांसह 86 गावांचा समावेश असून, 86 गावात फक्‍त चारच पशुवैद्यकीय अधिकारी हजारो मुक्या जनावरांवर उपचार करतात. मात्र, एका पशुवैद्यकीय अधिकार्‍याकडे किमान 20 ते 22 गावांतील पशुपक्ष्यांच्या वैद्यकीय सेवेचा पदभार असल्याने जनावरांना वेळेत सेवा मिळत नसल्याने जनावरांचे हाल होत आहेत. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागा रिक्‍त असल्याने कागल तालुक्यात ही दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. याबाबत लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष असल्याने ग्रामीण भागातील दूध उत्पादकांनी दुभती जनावरेही कत्तल खाण्याकडे पाठवण्यास सुरुवात केली आहे.
कागल तालुक्यात सांगाव, मुरगूड, सिद्धनेर्ली, म्हाकवे, कासारी, बाचणी, सोनगे, केनवडे या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये सांगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचा पदभार सौ. मुंडे यांच्याकडे आहे. तर डॉ. नाईक याच्याकडे सोनगे, कासारी, केनवडे या दवाखान्यांचा पदभार आहे. तर डॉ. पाटील यांच्याकडे सिद्धनेर्ली, लिंगनूर या दवाखान्यांचा पदभार आहे. डॉ. देसाई यांच्याकडे म्हाकवे, बाचणी या दवाखान्यांचा पदभार आहे. चार डॉक्टरांपैकी दोन पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत, तर मुरगूड व संपूर्ण भुदरगड तालुका डॉ. नाईक यांच्याकडे पदभार आहे. 

शेतकर्‍याला दुभती जनावरे हाच आधार आहे. मात्र, शासन हा आधारच काढून घेत असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. तालुक्यात केवळ 86 गावांसाठी चारच पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने लसीकरण, गर्भधारणा करणे यासारखी कामे करताना पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची दमछाक होत आहे.