Fri, Jul 19, 2019 15:58होमपेज › Kolhapur › ‘शाहू’च्या प्रगतीत औताडे यांचे मोलाचे योगदान  

‘शाहू’च्या प्रगतीत औताडे यांचे मोलाचे योगदान  

Published On: Jan 15 2018 1:48AM | Last Updated: Jan 14 2018 11:07PM

बुकमार्क करा
कागल  : प्रतिनिधी

छ. शाहू साखर कारखान्याच्या प्रगतीबरोबरच शाहू उद्योगाच्या प्रगतीमध्ये कार्यकारी संचालक विजय औताडे यांचे योगदान मोठे असून, पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीलादेखील सावरण्याचे काम त्यांनी अनेकवेळा केले आहे. अडचणीच्या काळात नेहमीच त्यांचे मार्गदर्शन दिशादर्शक ठरले आहे. भविष्यातदेखील त्यांनी मार्गदर्शक म्हणून नव्हे, तर सहकारी म्हणून सूचना कराव्यात, असे प्रतिपादन ‘म्हाडा’चे अध्यक्ष व छ. शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कारखान्याच्या शिक्षण संकुलामध्ये आयोजित कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे बोलत होते. यावेळी श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, सौ. नवोदितादेवी घाटगे, कार्यकारी संचालक विजय औताडे, कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सौ. सुनीता औताडे प्रमुख उपस्थित होते.

विजय औताडे म्हणाले, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सान्निध्यात अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आपल्यावर पडला. शाहू कारखान्यातील कार्यकाल हा माझ्यासाठी सुवर्णकाल आहे. राजेंच्या दूरदृष्टीमुळेच शाहू साखर कारखाना देशात आदर्श ठरला. त्यांनी मेहनतीने, बारकाईने, चिकाटीने कामे केली त्यामध्येच ‘शाहू’च्या यशाचे गमक आहे.

कार्यक्रमात स्वागत कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक बाळासाहेब तिवारी यांनी केले. निवृत्त डीवायएसपी सुरेश पोवार, प्रा. सुनील मगदूम, राजाराम साखर कारखान्याचे सल्लागार पी. जी. मेढे यांची भाषणे झाली. आभार बाजीराव पाटील यांनी मानले. यावेळी कारखान्याचे माजी अधिकारी-कर्मचारी, तसेच कर्मचारी- अधिकारी यांचे कुटुंबीय उपस्थित  होते.