Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Kolhapur › कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणावर  हातोडा

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणावर  हातोडा

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 11 2018 12:20AM

बुकमार्क करा
कसबा सांगाव : वार्ताहर

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मुख्य रेमंड चौकातील व अंतर्गत रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या अतिक्रमणावर महामंडळाने पोलिस बंदोबस्तात धडक कार्यवाही केली. लहान-मोठे पत्र्याचे शेड, छोटी दुकाने, खोकी, टपर्‍या, हातगाड्या यामुळे गुदमरलेला चौक, रस्त्यावरील अतिक्रमण जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडण्यात आले. या धडक कार्यवाहीचे उद्योजकांतून समाधान व्यक्‍त होत आहे. तर हातावरील पोटावर व्यवसाय करणार्‍या छोट्या व्यापार्‍यांना गहीवरून आले होते. मोठ्या पोलिस फौजफाट्यासह ही कार्यवाही झाली.

फ्रॉस्टी आईस्क्रिम कागल औद्योगिक वसाहतीतील चौका-चौकात विशेषता मुख्य रेमंड  चौकात पत्र्याचे शेड उभारून, ठिकठिकाणी हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात छोट्या व्यवसायिकांनी व्यवसाय मांडला होता. त्यामध्ये केशकर्तनालयासह, पंक्‍चर, गाड्याची दुरुस्ती, नाष्टा, जेवण, फळ विक्रेत्यांचा समावेश होता. यापाठोपाठ अनेक ठिकाणी अनधिकृतरीत्या मद्य विक्रीही सुरू होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांचे प्रमाण वाढले होते. उद्योजकवर्गातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त होत होती. अनेक वेळेला याबाबत औद्योगिक महामंडळ, पोलिस स्टेशनला निवेदन देऊन बैठकाही झाल्या होत्या. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास औद्योगिक महामंडळाच्या अधिकार्‍यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने धडक कार्यवाही सुरू केली. चहाच्या गाड्या, टपर्‍या, खोकी पाडताना अनेक छोट्या व्यापार्‍यांचा विरोध तुटंपुजा पडला.  मालासह खोकी जमीनदोस्त करून, अक्षरशः चुराडा करण्यात आला. क्रेनचा वापर करून खोकी उचलून नेण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कागलचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, गोकुळ शिरगावचे पोलिस निरीक्षक युवराज खाडे, गांधीनगरचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह 30 हून अधिक पोलिस, एमआयडीसी उपअभियंता एस. व्ही. अपराज, एकनाथ पाटील, भुरले, अग्‍निशामक दलाचे जवान, कर्मचारीही या कार्यवाहीत सहभागी झाले होते.