Sun, Oct 20, 2019 11:26होमपेज › Kolhapur › बसस्थानकावरील हिरकणी कक्ष अडगळीत!

बसस्थानकावरील हिरकणी कक्ष अडगळीत!

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 12:31AM

बुकमार्क करा
कागल : बा. ल. वंदुरकर

राज्यातील प्रत्येक बसस्थानकामध्ये स्तनदा मातांसाठी लाखो रुपये खर्च करून स्वतंत्र हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या कक्षांचा वापर सध्या अनेक ठिकाणी मातांऐवजी स्थानकप्रमुखांनी तसेच कर्मचार्‍यांनी कार्यालय म्हणून तसेच गोडावून, अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठीच केला आहे. त्यामुळे प्रवासी स्तनदा मातांना बसस्थानकावरील बाकड्यावर बसूनच लहान बाळांची भूक भागवावी लागत आहे. त्यामुळे मातांसाठी सुरू केलेला उपक्रम केवळ कागदोपत्रीच राहिला आहे. बसस्थानकावर येणार्‍या स्तनदा मातांंना बाळाला दूध पाजण्याकरिता कोणत्याही प्रकारचा आडोसा नसतो. त्यामुळे त्यांची कुचंबना होते. बाळाला दूध चोरून बसून पाजावे लागते.

अशा मातांना हक्काची जागा असावी म्हणून राज्यातील बहुतांशी बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली. स्वतंत्रपणे इमारत बांधण्यात आली. या हिरकणी कक्षामध्ये जाऊन सुरक्षितपणे बाळाला दूध पाजता येईल, काही क्षण विश्रांती घेता येईल, तसेच या ठिकाणी लहान बाळांसाठी खेळणी देखील ठेवण्यात येतात. मात्र, या उपक्रमाचा बहुतांशी ठिकाणी फज्जा उडाला आहे. स्तनदा मातांऐवजी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी या कक्षाचा ताबा घेतला आहे. हिरकणी कक्षामध्ये काही ठिकाणी स्थानकप्रमुखांनी आपले कार्यालय सुरू केले आहे. एस. टी. बसेसची माहिती, विद्यार्थी तसेच नोकरदारांच्या पासेसची माहिती, शासनाची परिपत्रके, आदेश, सहली याचा सर्व कारभार सध्या या हिरकणी कक्षामधूनच सुरू आहे. साफसफाई करणार्‍या कर्मचार्‍यांचे साहित्य, मोडक्या खुर्च्या, टेबल ठेवण्यासाठी गोडावून म्हणूनच त्याचा दुरुपयोग सुरू आहे.

बसस्थानकाला अनेकवेळा परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी भेट देतात; मात्र त्यांचे याकडे अद्याप कसे काय लक्ष गेले नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जाणून-बुजूनच दुरुपयोग होत असलेल्या या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बसस्थानकामध्ये स्तनदा मातांसाठी असलेल्या हिरकणी कक्षाविषयी म्हणावी तेवढी जागृती जाणून-बुजून करण्यात आली नाही. या कक्षाविषयी बसस्थानकामध्ये कुठेही माहितीचे फलक नाहीत. त्यामुळे प्रवासी मातांना याची माहिती होत नाही. या कक्षाविषयी विश्‍वासार्हता असणे गरजे आहे. मात्र, ती जपण्यात आली नाही. अधिकार्‍यांकडून कक्षाचा वापर आपल्या रूबाबासाठी केला जात आहे.