Fri, May 29, 2020 01:13होमपेज › Kolhapur › आता बाराखडीची झाली चौदाखडी!

आता बाराखडीची झाली चौदाखडी!

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 26 2017 11:09PM

बुकमार्क करा

कागल ः बा. ल. वंदूरकर

राज्यातील प्राथमिक शाळांतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नीटपणे वाचता, बोलता यावे, शब्दाचा अर्थ समजावा, त्याचा उच्चार स्पष्ट व्हावा, घर आणि शाळा यांच्यात फरक न राहता विद्यार्थी अभ्यासाकडे वळावा, त्याला आदर्श वाचन करता यावे, यासाठी शासनाने सध्या मूलभूत वाचन क्षमता विकास कृती कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मराठी शब्दोच्चारात मुलांना येणारी अडचण लक्षात घेऊन बाराखडीत अ‍ॅ आणि ऑ या इंग्रजी भाषेत वापरण्यात येणार्‍या नव्या दोन स्वरांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील मुलांची बाराखडी आता चौदाखडी झाली आहे.
शंभर टक्के विद्यार्थ्यांचा शंभर टक्के मूलभूत वाचन क्षमता विकास कृती कार्यक्रम सध्या सुरू करण्यात आला आहे.

त्यासाठी राज्यपातळीवर तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यार्थी शाळेत आल्यापासून त्यांच्या आवडी-निवडी, खेळ, त्यांचे चालणे-बोलणे, उड्या मारणे, वाचन, उच्चार, शाळा आणि घर यांच्यात फरक न करता त्याला आभ्यासाकडे वळविणे, अशा विविध स्तरांवर त्याला शिक्षण दिले जाणार आहे.  यासाठी तालुकानिहाय शिक्षकांना  प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचा अंमल येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. इंग्रजी भाषेतील काही शब्द मराठी भाषेत शिरले आहेत. ते आता मराठीच झाले आहेत. अशा शब्दांना पर्याय उरले नाहीत. इंग्रजीतील  त्या शब्दांची मराठी बोलीभाषाच झाली आहे. काँग्रेस, बॅट, कॅप असे विविध प्रकारचे शब्द मराठीच असल्याचे वाटतात. हे शब्द मराठी भाषेत वापरल्याशिवाय पर्याय उरला नाही.

म्हणून आता मराठी बाराखडीत अशा प्रकारचे उच्चार होण्याकरिता अ‍ॅ आणि ऑ या नव्या दोन स्वरांची भर पडली आहे. याबाबतचा शासन निर्णय यापूर्वीच झाला आहे; मात्र मूलभूत वाचन क्षमता विकास कृती कार्यक्रमातून हा स्वर पुढे आणण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीतील काही विद्यार्थ्यांना अद्यापही वाचता येत नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यातच मराठी भाषेतील शुद्धलेखनाचे काही नवीन नियमही तयार करण्यात आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना तीन महिन्यांत शंभर टक्के वाचता येईल, याची हमी देणारा मूलभूत वाचन क्षमता विकास कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मूलभूत वाचन क्षमता विकास कृती कार्यक्रम सध्या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आला आहे.