Sun, Apr 21, 2019 01:51होमपेज › Kolhapur › महावितरणचा तगादा

महावितरणचा तगादा

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:13PMकागल : प्रतिनिधी

महावितरणकडून मुदतीच्या आतच विजेची बिले भरण्यासाठी तगादा लावून ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे. तसेच विजेचे कनेक्शन तोडून नुकसान केले जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकवर्गातून संताप व्यक्‍त केला जात आहे. वेळेवर आणि बिनचूक बिले मिळत नाहीत, तरीदेखील वसुलीसाठी मात्र सतत पाठलाग केला जात आहे. घरगुती, तसेच औद्योगिक विजेच्या मीटरचे रीडिंग बरोबर घेतले जात नाही. त्याबाबत सातत्याने ग्राहकांच्या तक्रारी असताना बिले बिनचूक येत नाहीत. वसुलीकरिता मात्र ग्राहकांच्या दाराला जाऊन सक्‍तीने वसुली केली जात आहे. वसुलीसाठी येणारे कर्मचारी बिलात असणार्‍या चुका दुरुस्त करीत नाहीत.

पहिल्यांदा बिल भरा, दुुरुस्तीचे नंतर पाहू, असे सांगून विजेचे बिल तत्काळ भरले नाही तर विजेचे कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला जातो. दारात उभे राहूनच बिल भरले की नाही, याची चौकशी करीत असतात. त्यामुळे बहुतांशी ग्राहकांना अपमानीत व्हावे लागत आहे. ज्यांनी बिल भरले त्यांनाही अशाच प्रकारची विचारणा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात वसुलीसाठी येणार्‍या कर्मचार्‍यांकडून असे प्रकार घडत आहेत.

विजेच्या घरगुती वापराची बिले उशिरा येत असतात. बिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या तीन-चार दिवस अगोदर येत असतात, त्यानंतर बिलांच्या पाठोपाठ लगेचच वसुलीकरीता कर्मचारी येत असतात. ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब ग्राहकांकडे विजेचे बिल भरण्यासाठी पुरेसे पैसे नसतात. पैशांची जुळणी करावी लागते. मात्र, अंतिम तारखेनंतर लगेच बिल भरले नसल्याच्या कारणावरून विजेचे कनेक्शन तोडले जाते. बहुतांशवेळा ग्राहकांना याची माहिती दिली जात नाही.

चौकशीअंती थकीत बिलापोटी विजेचे कनेक्शन तोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. बर्‍याचवेळा अंतिम बिल भरण्याची तारीख तीन-चार दिवस शिल्‍लक असताना बिले येत असतात, त्यामध्ये चुकीचे रीडिंग, नादुरुस्त मीटर, लॉक मीटर असा बिलात गोंधळ असतो. औद्योगिक क्षेत्रातील वीज बिलांची वसुली करताना आणि विजेचे कनेक्शन तोडताना गांभीर्याने घेतले नाही, तर  व्यावसायिकांना नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.