Wed, Nov 21, 2018 03:44होमपेज › Kolhapur › कोल्हापूर पोलिस संघाची साईनाथ स्पोर्टस्वर मात

कोल्हापूर पोलिस संघाची साईनाथ स्पोर्टस्वर मात

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 29 2018 12:49AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर पोलिस संघाने साईनाथ स्पोर्टस् संघावर 2 विरुद्ध 0 गोलफरकांनी मात केली. स्पर्धा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत.साईनाथ स्पोर्टस् संघाचा खेळाडू कार्तिक बागडे याने डीमध्ये चेंडू हाताने हाताळल्याने पोलिस संघास पेनल्टी मिळाली. या संधीचा फायदा उठवत ‘पोलिस’कडून 3 मिनिटाला युक्ती ठोंबरे याने गोल नोंदवून संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलची बरोबरी करण्यासाठी साईनाथ स्पोर्टस् संघाने सातत्याने चढाया केल्या; पण पोलिस संघाच्या बचाव फळीने त्या परतवून लावल्या. पूर्वार्धात 1-0 गोलनी पोलिस संघ आघाडीवर राहिला. 

उत्तरार्धात दोन्ही संघांचा तोडीस तोड खेळ झाला. साईनाथ स्पोर्टस् संघाच्या खेळाडूंची अतिघाई उत्तरार्धात नडली, तर पोलिस संघाने गोलच्या सोप्या संधीवर पाणी सोडले. त्यामुळे समर्थकांची भ्रमनिराशा झाली.पोलिस संघाचा खेळाडू युक्ती ठोंबरेने फ्री किकची सोपी संधी दवडली. तर सोमनाथ लांबोरेच्या पासवर संतोष तेलंगची गोलची संधी वाया गेली.साईनाथ स्पोर्टस्च्या वीरधवल जाधवने फ्री किकवर गोलची नामी संधी दवडली. 70 मिनिटाला साईन स्पोर्टस् संघाचा खेळाडू अश्‍विन टाकळकर याने स्वयंम गोल नोंदवत पोलिस संघाच्या गोल संख्येत भर घातली. ही आघाडी कायम ठेवत पोलिस संघाने सामना जिंकला.  पोलिसकडून उमेश कांबळे, अरबाज शेख, संतोष तेलंग, सौरभ पवार आणि संकेत वेसनेकर यांनी उत्कृष्ट चढाया केला. तर साईनाथ स्पोर्टस्च्या जय कामत, कार्तिक बागडेकर, वीरधवल जाधव, ऋषिकेश पाटील, अवधूत गुरव, सोहेल अलिखान यांचा खेळ चांगला झाला.