Thu, Apr 25, 2019 21:25होमपेज › Kolhapur › ‘पाटाकडील’ची ‘दिलबहार’वर 2-1 ने मात

‘पाटाकडील’ची ‘दिलबहार’वर 2-1 ने मात

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 15 2018 10:50PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

फुटबॉल महासंग्राम स्पर्धेनंतर (2007) यंदाच्या हंगामात प्रथमच फुटबॉल शौकिनांच्या खचाखच गर्दीने छत्रपती शाहू स्टेडियम भरले. सोमवारी ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेतील पाटाकडील तालीम ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम ‘अ’ या संघांतील महत्त्वपूर्ण सामना झाला. यात दिलबहारची आघाडी दुसर्‍याच मिनिटाला कमी करण्याबरोबरच त्यांचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून पाटाकडील तालीम मंडळाने आपले आव्हान कायम राखले. 

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळाचा अवलंब करण्यात आला. दिलबहारकडून जावेद जमादार, किरण चौकाशी, इबीरे, निखिल जाधव, विकी सुतार, सनी सणगर यांनी आघाडीसाठी चढाया केल्या. यात त्यांना 17 व्या मिनिटाला यश आले. किरण चौकाशीने गोल नोंदवत मिळवलेली आघाडी फार काळ टिकली नाही. पीटीएमकडून 19 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत अकिमच्या कॉर्नर पासवर ऋषीकेश मेथे-पाटील याने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत केला.


उत्तरार्धात सामन्यावर पूर्णपणे पीटीएमचे वर्चस्व होते. त्यांच्या ऋषीकेश मेथे-पाटील, ओंकार जाधव (गडहिंग्लज), ऋषभ ढेरेे, ओंकार जाधव (कोल्हापूर), रणजित विचारे, अकिम यांनी आघाडीत भर घालण्यासाठी योजनाबद्ध चाली केल्या. 56 व्या मिनिटाला अकिमच्या पासवर ऋषीकेश मेथे-पाटीलने वैयक्तिक आणि संघाकडून दुसर्‍या गोलची नोंद केली. या दुसर्‍या गोलची परतफेड दिलबहारला शेवटपर्यंत करता आली नाही. 

दिलबहार ‘ब’चा पोलिस संघावर विजय
तत्पूर्वी, झालेल्या सामन्यात दिलबहार ‘ब’ संघाने कोल्हापूर पोलिस संघावर 2-0 असा विजय मिळवला. दिलबहारच्या स्वप्निल भोसले, मसूद मुल्ला, प्रशांत आजरेकर, रोहित पटेल यांनी गोलसाठी चढायांचा अवलंब केला. यात 24 व्या मिनिटाला स्वप्निल भोसलेने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळवली. उत्तरार्धात त्यांच्या सागर साळवीने 56 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवत 2-0 अशी आघाडी भक्कम केली. पोलिसच्या लखन मुळीक, नितीन रेडेकर, सौरभ पोवार, युक्ती ठोंबरे यांनी गोल फेडण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. 

आजचे सामने :   उत्तरेश्‍वर तालीम वि. संयुक्त जुना बुधवार पेठ, 2 वाजता   प्रॅक्टिस क्लब ‘अ’ वि. फुलेवाडी क्रीडा मंडळ, 4 वाजता

अकिम जखमी, सनीला रेड कार्ड...
सामन्याच्या उत्तरार्धात दिलबहारच्या सनी सणगरने चुकीच्या पद्धतीने केलेल्या खेळामुळे पीटीएमचा अकिम हा खेळाडू जखमी झाला. त्याच्या चेहर्‍यावर झालेल्या दुखापतीमुळे त्याला अ‍ॅम्ब्युलन्समधून उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामुळे मुख्य पंच सुनील पोवार यांनी सनी सणगरला रेड कार्ड दाखवून सामन्याबाहेर केले. या प्रकारामुळे मैदानात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.