Sat, Apr 20, 2019 16:19होमपेज › Kolhapur › बालगोपाल, पीटीएम ‘ब’ ची आघाडी

बालगोपाल, पीटीएम ‘ब’ ची आघाडी

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:23AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

चुरशीच्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर एकमेव गोलने विजय मिळविला. दुसर्‍या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ संघाने कोल्हापूर पोलिस  संघावर 3-1 अशा गोलफरकाने मात करून आघाडी मिळविली.  

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ‘केएसए’ लिग फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या सामन्यात पाटाकडील ‘ब’ संघाने कोल्हापूर पोलिस संघावर 3-1 असा विजय मिळविली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रथमेश पाटील, रोहन जाधव, संग्राम शिंदे, ओंकार देवणे, पवन सरनाईक यांनी आघाडीसाठी प्रयत्न सुरु ठेवले. यात त्यांना 15 व्या मिनीटाला यश आले. रोहन कांबळे याने गोल नोंदवून आघाडी मिळविली. 40 व्या मिनीटाला त्यांच्या आकाश काटे याने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धातही त्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. 54  व्या मिनीटाला रोहन कांबळे याने वैयक्तीक दुसरा आणि संघाकडून तिसरा गोल केला. पोलिसकडून युक्ती ठोंबरे, अरबाज शेख, नितीन रेडेकर, लखन मुळीक, उमेश कांबळे यांनी गोल फेडण्यासाठी प्रयत्न सुरुच होते. 74 व्या मिनीटाला युक्ती ठोंबरे याने एक  गोल फेडला. उर्वरित गोल त्यांना फेडता न आल्याने सामना पीटीएमने 3-1 असा जिंकला. 

ईमिझी डोलस्कोचा विजयी गोल...

सायंकाळी फुलेवाडी  विरुध्द बालगोपाल यांच्यात सामना रंगला.  चुरशीच्या सामन्यात पहिल्या पाचव्या मिनीटात  बालगोपालकडून गोलची नोंद झाली. सुरज जाधवच्या पासवर ईमिझी डोलस्कोने गोल केला. 

यानंतर त्यांच्या ऋतूराज पाटील, ईबीरी चिकूहू, रोहित कुरणे, सुरज जाधव, ईमिझी यांनी आघाडीत भर घालण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. फुलेवाडीकडून ओकिकी ओबीना, संकेत साळोखे, रोहित मंडलिक, शुभम साळोखे, सिध्देश यादव, तेजस जाधव यांनी गोल फेडण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. यामुळे सामना बालगोपालने 1-0 असा जिंकला. 

केएसए लिग स्पर्धेच्या बक्षिसात वाढ...

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ‘केएसए लिग’ फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीसात यंदा वाढ करण्यात आली आहे. केएसएचे चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या वाढदिवसानिमीत्त वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे पेट्रन मेंबर मालोजीराजे यांनी याबाबतची घोषणा केली. यानुसार लिग विजेत्या संघास  70 हजार व फिरती आणि कायमस्वरुपी ट्रॉफी, उपविजेत्या संघास 35 हजार व ट्रॉफी, तिसर्‍या क्रमांकास 20 हजार आणि चौथ्या क्रमांकास 10 हजार रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. बक्षीसाची ही रक्‍कम 1 लाख 35 हजार रुपये इतकी असणार आहे.