होमपेज › Kolhapur › ‘संध्यामठ’ने ‘बालगोपाल’ला झुंजविले

‘संध्यामठ’ने ‘बालगोपाल’ला झुंजविले

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:27AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

चुरशीच्या सामन्यात संध्यामठ तरुण मंडळाने बालगोपाल तालीम मंडळाला विजयासाठी झुंजविले. अटीतटीच्या सामन्यात बालगोपालने एकमेव गोलने सामना जिंकत आघाडी मिळविली. पूर्वार्धात 27 व्या मिनिटाला श्रीधर परबने विजयी गोल केला. 

कोल्हापूर स्पोर्टस् असो. (केएसए) आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. बुधवारच्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळ झाला. बालगोपालच्या सुरज जाधव, रोहित कुरणे, सुमित घाटगे, प्रतीक पोवार, बबलू नाईक, श्रीधर परब यांनी आघाडीसाठी जोरदार चढायांचा अवलंब केला. 27 व्या मिनिटाला रोहित कुरणेच्या पासवर श्रीधर परबने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात आघाडी भक्‍कम करण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न झाले. मात्र, फिनिशिंगअभावी त्यांना यश आले नाही. संध्यामठकडून कडवी झुंज सुरूच होती. गोलची परतफेड करण्यासाठी अजिंक्य गुजर, सिद्धार्थ कुर्‍हाडे, शाहू भोईटे, सतीश अहिरे, सौरभ हारुगले, आशिष पाटील यांनी लागोपाठ चढाया केल्या. मात्र, अखेरपर्यंत त्यांना गोलची परतफेड करता आली नाही. यामुळे सामना बालगोपालने 1-0 असा जिंकला.