कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी
सामन्याच्या उत्तरार्धात 67 व्या मिनिटाला मध्यरेषेपासून (सेंटर) राईट आऊटच्या दिशेने मारलेल्या सुरेख फटक्यावर गोलपोस्टचा अचूक वेध घेत निखिल कुलकर्णी याने मारलेल्या नेत्रदीपक गोलने पुन्हा एकदा फुटबॉलशौकिनांची मने जिंकली. काही दिवसांपूर्वी निखिलने दिलबहार ‘ब’ विरुद्ध मारलेल्या अशाच गोलच्या क्लिपचे कौतुक सोशल मीडियावरून सर्वत्र झाले होते. दरम्यान, सामन्यात संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळाने प्रॅक्टिस क्लब ‘ब’ संघाचा 2-0 असा पराभव करून ‘केएसए’ लिग फुटबॉल स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळाचा अवलंब झाला. संयुक्त जुना बुधवार पेठेने आघाडीसाठी योजनाबद्ध चाली केल्या.
आजचा सामना : बालगोपाल तालीम वि. संध्यामठ तरुण मंडळ, सायंकाळी 4 वाजता.
केएसए तर्फे निवड चाचणीचे आयोजन
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असो. (विफा) तर्फे जळगाव व पालघर येथे महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर बॉईज व गर्ल्स तसेच महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॉईज इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल चॅम्पियनशिप 10 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. स्पर्धेकरिता कोल्हापूरचे संघ पाठविण्यात येणार आहेत. याकरिता 1 फेब्रुवारीपासून निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. संबंधित खेळाडूंनी गुरुवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता, छत्रपती शाहू स्टेडियमवर फुटबॉल कीट व जन्मतारखेच्या दाखल्यासह (सत्यप्रत) उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.