Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Kolhapur › पाटाकडील-प्रॅक्टिस यांच्यात आज अंतिम लढत

पाटाकडील-प्रॅक्टिस यांच्यात आज अंतिम लढत

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:48AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

‘केएसए फुटबॉल लिग 2017-18’ चा विजेता-उपविजेता संघ कोणता? तिसर्‍या क्रमांकावर कोणाला समाधान मानावे लागणार? याची उत्सुकता तमाम फुटबॉलप्रेमींना लागून राहिली आहे. याचा फैसला रविवारी दि. 4 फेब्रुवारी रोजी छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार आहे. 

स्पर्धेतील शेवटचा सामना पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लब ‘अ’ यांच्यात होणार आहे. बक्षीस समारंभाने स्पर्धेची सांगता होईल. दरम्यान, शनिवारच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ संघाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा 2-1 असा पराभव करून लिगमधील उपविजेते आणि तृतीय क्रमांकासाठीची आपली दावेदारी कायम राखली आहे. दुसर्‍या सामन्यात साईनाथ स्पोर्टस्कडून दिलबहार ‘ब’ ला पराभव पत्करावा लागल्याने कोल्हापूर पोलिस संघाला वरिष्ठ गटातून ‘ब’ गटात पायऊतार व्हावे लागले. 

इचीबेरी ठरला तारणहार

सुपर सिनिअर गटात दिलबहार तालीम ‘अ’ संघाला लिगमधील आपले आव्हान टिकविण्यासाठी फुलेवाडी मंडळावर विजय नितांत गरजेचा होता. सामना मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात दिलबहारकडून 41 व्या मिनिटाला इचीबेरीच्या उत्कृष्ट पासवर किरण चौकाशीने गोल नोंदवत आघाडी मिळविली. ही आघाडी फार काळ टिकली नाही. फुलेवाडीच्या रोहित मंडलिकच्या पासवर अक्षय मंडलिकने गोलची परतफेड करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. सामन्याची वेळ संपल्यानंतर केवळ दोन मिनिटांचा जादा वेळ पंचांनी जाहीर केला. यातील दीड मिनिटांचा खेळही झाला. फायनल व्हीसल वाजण्यापूर्वी दोन-चार सेकंद इचीबेरीने फुलेवाडीची बचावफळी भेदत गोलरक्षक निखील खाडेला चकवत गोलची नोंद करून सामना दिलबहारला 2-1 असा जिंकून दिला. यामुळे त्यांचे स्पर्धेतील तिसरे स्थान पक्के झाले असून अंतिम सामन्याच्या गोलफरकावर त्यांना उपविजेतेपदाचीही संधी प्राप्त झाली आहे. 

साईनाथला वरिष्ठ गटात स्थान

सिनिअर गटात साईनाथ स्पोर्टस् व कोल्हापूर पोलिस संघ यांचे समान गुण झाल्याने वरिष्ठ गटात कोण राहणार? आणि कनिष्ठ गटात पायउतार कोणाला व्हावे लागणार? याची उत्सुकता होती. साईनाथ स्पोर्टस्ने दिलबहार ‘ब’ चा एकमेव गोलने पराभव करून वरिष्ठ गटात आपले स्थान कायम राखले. उत्तरार्धात 81 व्या मिनिटाला ओंकार लायकरच्या पासवर वीरधवल जाधव याने विजयी गोल केला. 

रँकिंगची सोशल मीडियावर चर्चा 

सन 2017-18 च्या फुटबॉल हंगामातील ‘केएसए’ लिगचा विजेता-उपविजेता कोणता संघ ठरणार? याची प्रचंड उत्सुकता तमाम फुटबॉलप्रेमींना लागून राहिली आहे. गतवर्षीचा विजेता पाटाकडील तालीम ‘अ’ संघाने यंदा पुन्हा आपले आव्हान कायम राखले आहे. तर लिगमध्ये मुसंडी मारत प्रॅक्टिस क्‍लब ‘अ’ संघानेही आपली दावेदारी सिद्ध केली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 14 गुण व 11 गोलफरकासह तुल्यबळ खेळी करत अंतिम लढतीत प्रवेश केला आहे. सामना जिंकणारा संघ 17 गुणांसह लिग विजेता ठरणार असून बरोबरी झाल्यास सामन्याचा निर्णय नियमानुसार ‘टॉस’ वर होणार आहे. दरम्यान, गतवर्षीचा उपविजेता दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ संघासह बालगोपाल तालीम मंडळात उपविजेतेपदासाठी चुरस आहे. यासह आपल्या संघाचे श्रेष्ठत्व सांगणार्‍या पोस्टस्ची देवाण-घेवाण सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

आज बक्षीस समारंभ ‘केएसए’ लिग फुटबॉल 

स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. रविवार दि. 4 फेब्रुवारी, रोजी सायंकाळी 4 वाजता, पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टिस क्‍लब ‘अ’ यांच्यात शेवटचा सामना होईल. सामन्यानंतर ‘केएसए’चे चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कुशल दास यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस समारंभ होईल. यावेळी खा. संभाजीराजे, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे, सचिव साऊटर वाझ, सीईओ हेन्‍री मॅनेजेस, जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते आदी उपस्थित राहणार आहेत. लिग विजेत्या संघास 70 हजार, फिरता व कायमस्वरूपी चषक, उपविजेत्या संघास 35 हजार व चषक, तिसर्‍या क्रमांकाच्या संघास 20 हजार आणि चौथ्या क्रमांकाच्या संघास 10 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.