Sat, Sep 22, 2018 04:54



होमपेज › Kolhapur › केएमटी प्रवासही महागणार

केएमटी प्रवासही महागणार

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 1:02AM



कोल्हापूर : सतीश सरीकर

दिवसेंदिवस तोट्याकडे धावणार्‍या केएमटीने (कोल्हापूर महापालिका परिवहन उपक्रम) ऊर्जितावस्थेसाठी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. पहिल्या टप्प्याला एक रुपये वाढ केली जाणार असल्याने किमान तिकीट आठ रुपये होणार आहे. पुढील टप्प्यांना दोन ते पाच रुपये वाढीचा प्रस्ताव आहे. केएमटी प्रशासनाकडून या आठवड्यात आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर प्राधिकरणाच्या म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने त्यावर शिक्कामोर्तब होईल. एक ऑगस्टपासून दरवाढीची अंमलबजावणी करण्यासाठी केएमटी प्रशासन प्रयत्नशील आहे. वाढीतून दररोज 70 ते 80 हजार रुपये जादा उत्पन्नवाढ अपेक्षित असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

रोजचा तोटा तीन लाखांवर...

दररोज होणारी डिझेल दरवाढ, मेंटेनन्सचा खर्च, नोकर पगार, जीएसटीमुळे सुट्ट्या पार्टस्च्या वाढलेल्या किमती, इन्श्युरन्स व इतर टॅक्समध्ये झालेली वाढ आदींमुळे केएमटी तोट्यातून धावत आहे. त्यातच वडाप व एस.टी.ची समांतर वाहतूक सुरू असल्याने त्याचा केएमटीला फटका बसत आहे. परिणामी, रोजचा तोटा सुमारे तीन लाखांवर गेला आहे. संचित तोट्याची रक्कम वाढतच आहे. सद्यस्थितीत कर्मचार्‍यांचे पगार भागविण्यासाठीही प्रशासनाची तारांबळ उडत आहे. 

रोज साडेपाच लाखांचे डिझेल...

यापूर्वी 5 ऑक्टोबर 2013 ला तिकीट दरवाढ केली होती. सुधारित दराचा अंमल सुरू झाल्यानंतर समांतर वाहतूक करणार्‍या इतर प्रवासी वाहनांची म्हणजे अ‍ॅपे, मिनिडोअर, तीन आसनी रिक्षा आदींचे दर केएमटीच्या तुलनेत कमी राहिले. तसेच एस. टी. महामंडळाचे केएमटी मार्गावरील तिकीट दर टप्पा रचनेतील फरकामुळे प्रचंड तफावत असणारे निर्माण झाले. त्यामुळे 25 जानेवारी 2015 पासून तिकीट दर पुन्हा कमी करण्यात आले. सद्यस्थितीत केएमटीला रोज सुमारे सात हजार लिटर डिझेल लागते. त्यासाठी साडेपाच लाखांवर खर्च येतो.

28 मार्गांवर 105 बसेस...

केएमटीच्या ताफ्यात 129 बसेस आहेत. त्यापैकी 105 बसेस कोल्हापूर शहर व परिसरातील 28 मार्गांवर धावतात. सुमारे एक लाख प्रवासी केएमटीतून प्रवास करतात. रोज त्यातून सुमारे 7 लाख 50 हजार ते आठ लाख उत्पन्न मिळते. केएमटीला 40 किलोमीटरपर्यंत 20 टप्प्यात धावण्याची मंजुरी आहे. प्रत्येकी दोन कि. मी. चा असा एक टप्पा (स्टेज) आहे. परंतु, केएमटीच्या वतीने 11 टप्पे तिकिटासाठी धरण्यात आले आहेत. सध्या पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे किमान तिकीट सात रुपये आहे. त्यानंतर दुसरा टप्पा आठ रुपये, तिसरा टप्पा 10 रु., चौथा टप्पा - 11 रु., पाचवा टप्पा - 12 रु., सहावा टप्पा - 14 रु., सातवा टप्पा - 16 रु., आठवा टप्पा - 18 रु., नववा टप्पा - 19 रु., दहावा टप्पा - 20 रु. अकरावा टप्पा - 21 रु. असे तिकीट दर आहेत. दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यासाठी कोणतीही तिकीट दरवाढ होणार नाही. परंतु, त्यानंतरच्या टप्प्यांना दोन ते पाच रु. तिकीट दरवाढ होणार आहे.