Sat, Jul 20, 2019 08:42होमपेज › Kolhapur › केएमटी तिकीट रविवारपासून महागणार

केएमटी तिकीट रविवारपासून महागणार

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AM
कोल्हापूर ः सतीश सरीकर
कोल्हापूरची लाईफलाईन असलेल्या केएमटीचा प्रवास रविवारपासून महागणार आहे. पहिल्या टप्प्याला (स्टेज) एक रुपये वाढ केली जाणार असल्याने किमान तिकीट आठ रुपये होणार आहे. पुढील टप्प्यांना दोन ते पाच रुपये वाढ होणार आहे. सुमारे लाखांवर प्रवाशांच्या खिशाला एक ते पाच रुपयांपर्यंतची जादा चाट बसणार आहे. केएमटीच्या तिजोरीत मात्र रोज सुमारे 70 ते 80 हजारांची जादा भर पडणार आहे. दिवसेंदिवस तोट्यातून धावणार्‍या केएमटीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी
 प्रशासनाने दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
रोजचा तोटा तीन लाखांवर...
दररोज होणारी डिझेल दरवाढ, मेंटेनन्सचा खर्च, नोकर पगार, जीएसटीमुळे सुट्ट्या पार्टस्च्या वाढलेल्या किमती, इन्श्युरन्स व इतर टॅक्समध्ये झालेली वाढ, आदींमुळे केएमटी तोट्यातून धावत आहे. त्यातच वडाप व एस.टी.ची समांतर वाहतूक सुरू असल्याने त्याचा केएमटीला फटका बसत आहे. परिणामी, रोजचा तोटा सुमारे तीन लाखांवर गेला आहे. संचित तोट्याची रक्‍कम वाढतच आहे. सद्यस्थितीत कर्मचार्‍यांचे पगार भागविण्यासाठीही प्रशासनाची तारांबळ उडत आहे.
सद्यस्थितीत केएमटीला रोज सुमारे सात हजार लिटर डिझेल लागते. त्यासाठी साडेपाच लाखांवर खर्च येतो. केएमटीच्या ताफ्यात 129 बसेस आहेत, त्यापैकी 105 बसेस कोल्हापूर शहर व परिसरातील 28 मार्गांवर धावतात. सुमारे एक लाख प्रवासी केएमटीतून प्रवास करतात. रोज त्यातून सुमारे 7 लाख 50 हजार ते आठ लाख उत्पन्‍न मिळते. केएमटीला 40 किलोमीटरपर्यंत 20 टप्प्यात धावण्याची मंजुरी आहे. प्रत्येकी दोन कि. मी. चा असा एक टप्पा (स्टेज) आहे. परंतु, केएमटीच्या वतीने 11 टप्पे तिकिटासाठी धरण्यात आले आहेत.
तोटा कमी करण्यासाठी
दरवाढ ः संजय सरनाईक
वडापसह इतर समांतर यंत्रणा, डिझेलचे दर यामुळे केएमटीचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव तयार करून महासभेच्या मंजुरीने परिवहन प्राधिकरणकडे पाठविला होता. प्राधिकरणने त्याला मंजुरी दिली आहे. आता महापालिकेच्या प्रशासकीय मंजुरीनंतर 9 सप्टेंबरपासून तिकीट दरवाढीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे प्रभारी अतिरिक्‍त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी सांगितले.