Tue, Jul 16, 2019 23:55होमपेज › Kolhapur › ज्वालाग्रही केमिकलची महामार्गावर गळती 

ज्वालाग्रही केमिकलची महामार्गावर गळती 

Published On: Jan 02 2018 1:33AM | Last Updated: Jan 02 2018 1:00AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात असेंटिंन क्‍लोराईड विषारी केमिकलची गळती रोखण्यात अग्‍निशमन दलाला यश आले आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास चिपळूणहून तामिळनाडूकडे जाणार्‍या केमिकल वाहतूक ट्रकमध्ये हा प्रकार घडला. काही काळ महामार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती. 

एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनीचा ट्रक रविवारी रात्री केमिकलचे 50 बॅरेल घेऊन तामिळनाडूकडे निघाला होता. रात्री अकराच्या सुमारास 200 लिटरचे एक बॅरेल ट्रकमध्ये फुटले. केमिकल अतिज्वालाग्रही आणि विषारी असल्याने चालकाने याची माहिती अग्‍निशमन दलाला कळविली. स्थानक अधिकारी मनीष रणभिसे, ओंकार खेडकर, चंद्रकांत वासुदेव, कृष्णात मिठारी, मंदाळ कांदळकर, पुंडलिक माने आदी जवान घटनास्थळी आले. 

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गळती काढण्याचे काम सुरू करण्यात आले. एमसीलच्या सहाय्याने तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर गळती रोखण्यात यश आले. काम सुरू असताना काही काळ मुख्य महामार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती.