Sat, Apr 20, 2019 08:33होमपेज › Kolhapur › मलेशियात नोकरी, कंपनीत भागीदारी आमिषाने

आठ लाखांची फसवणूक

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 12:50AM

बुकमार्क करा

गडहिंग्लज : प्रतिनिधी 

मलेशियामध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने सहाजणांकडून साडेचार लाख रुपये घेऊन खालीद गुलाब पटेल (रा. गडहिंग्लज) याने तर अल्कोकेम कंपनीमध्ये धान्यपुरवठा ठेक्यामध्ये भागीदार घेण्यासाठी सलीश शहाजान शेख (रा. इचलकरंजी) याने 3 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याची तक्रार शनिवारी गडहिंग्लज पोलिस ठाण्यात दाखल झाली. या प्रकरणी पटेल व शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मलेशियामध्ये नोकरी लावण्यासाठी महंमदरफीक दादाहयात भाई (रा.गडहिंग्लज) यांच्यासह सहा मित्रांना नोकरीच्या आमिषाने खालीद पटेल याने प्रत्येकी 90 हजार घेतले. या सहाही युवकांना वर्किंग व्हिसा न देता 1 महिन्याचा ट्रॅव्हलिंग व्हिसा देऊन त्यांची फसवणूक केली. या युवकांनी कसेबसे मलेशियामधून भारतामध्ये येण्याचा प्रयत्न केला. भारतात आल्यानंतर पैशाची मागणी करूनही तो परत देत नसल्याने त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार सर्जेराव झुरळे करत आहेत.

प्रतीक मनोहर क्षीरसागर याला सलीम शहाजान शेख याने बेरडवाडी येथील अल्कोकेम कंपनीमध्ये आपल्याला धान्य पुरवण्याचे टेंडर मिळाले असून त्यामध्ये तुला पार्टनर करून घेतो असे म्हणून 5 लाखांची मागणी केली. प्रतीकने त्याला  4 लाख  दिले. शेख याने प्रतीकचा विश्‍वास बसण्यासाठी दर महिन्याला 20 हजारप्रमाणे तीन महिने पैसे आपल्या खात्यावरून ट्रान्स्फर केले. मात्र, त्यानंतर चौकशी केली असता त्याचे कोणतेही टेंडर नसून त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आले. तपास उपनिरीक्षक कुरणे करीत आहेत.